

सुनयना सोनवणे : पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख युवकांना करून देण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) माध्यमातून खास उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरात ‘एआय महासंगम’ उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील ५४५ ठिकाणी हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
एनसीसीच्या या उपक्रमाद्वारे सुमारे एक लाख २५ हजार युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमात युवकांना सहा तासांचे प्रशिक्षण देऊन एआय तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती आणि त्याच्या विविध उपयोगांची ओळख करून दिली जाणार आहे.
एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. युवकांना केवळ पारंपरिक प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील कौशल्यांची ओळख करून देण्यावर एनसीसीचा भर आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘एआय महासंगम’ आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना, त्याचा दैनंदिन जीवनातील वापर, विविध क्षेत्रांतील उपयुक्तता आणि तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांची माहिती युवकांना दिली जाणार आहे. सहा तासांच्या या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये एआयविषयी प्राथमिक समज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हा उपक्रम यापूर्वी ५ डिसेंबरला आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, तयारी आणि नियोजनामुळे त्याच्या आयोजनात बदल होण्याची शक्यता आहे. आता जानेवारी-फेब्रुवारी २०२७ मध्ये राज्यातील ५४५ ठिकाणी हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असून, नोंदणीसाठीची यंत्रणा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यागी यांनी स्पष्ट केले.
. ‘एआय महासंगम’ हा उपक्रम कोणामार्फत राबविण्यात येणार आहे?
राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्र संचालनालयाच्या माध्यमातून राज्यभरात ‘एआय महासंगम’ हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
‘एआय महासंगम’ उपक्रमांतर्गत किती युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे?
या उपक्रमांतर्गत राज्यातील ५४५ ठिकाणी सुमारे एक लाख २५ हजार युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) प्राथमिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी प्रत्येक प्रशिक्षण सत्र सहा तासांचे असणार आहे.
‘एआय महासंगम’ उपक्रम कधी आयोजित करण्यात येणार आहे?
हा उपक्रम सुरुवातीला ५ डिसेंबर रोजी आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, आता जानेवारी-फेब्रुवारी २०२७ मध्ये राज्यातील ५४५ ठिकाणी तो राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी नोंदणी यंत्रणा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.