फोटो सौजन्य सोशल मीडिया
त्यानुसार बारामती-निरा मार्गावरील शारदानगर ते माळेगाव राजहंस चौक या दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना २४ तास प्रवेशबंदी असणार आहे. सोमवार सकाळी ७ वाजल्यापासून मंगळवार सकाळी ७ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, सोमेश्वरनगरच्या सन २०२६ च्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील मतमोजणी केंद्रावर होणार आहे. या प्रक्रियेसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या परिसरात वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. तसेच अपघात आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. माळेगाव पोलिसांकडून या काळात वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात
वाहतूक नियोजनानुसार, सोमवार (दि. १२) सकाळी ७ वाजल्यापासून मंगळवार (दि. १३) सकाळी ७ वाजेपर्यंत बारामती-निरा मार्गावरील शारदानगर ते माळेगाव राजहंस चौक या दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत या मार्गावरून वाहनचालकांना प्रवास करता येणार नाही.
मात्र, शासकीय वाहने आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या बंदीतून वगळण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, तसेच परिसरातील वाहतुकीचे व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे. त्यानुसार शारदानगर येथून के. व्ही. के. ट्रस्ट कॅनॉल रोडने माळेगाव राजहंस चौकात जाता येणार आहे. तसेच राजहंस चौक ते माळेगाव कारखाना मार्गे पाहुणेवाडी-शारदानगर-बारामती या पर्यायी मार्गाचा वापर करता येणार आहे.
या मार्गांवरून सर्व प्रकारची वाहने वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतूक बदलांची माहिती घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि माळेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.






