संग्रहित फोटो
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या आकराव्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी सरकारला रविवारी निर्वाणीचा इशारा दिला असून, विद्यार्थ्यांवर सलग दोन गुन्हे नोंद झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्यास उद्याचे आंदोलन महागात पडेल, असे म्हटले आहे. तर, “एमपीएससीचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचे खास मित्र असून, मित्राला वाचवण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही, असा आरोप देखील मुख्यमत्र्यांवर केला आहे.
रोहित पवार म्हणाले, आम्ही शुद्धीकरणाचा ड्राफ्ट सरकारला दिला आहे. हे गरीब, शेतकरी, शेतमजुरांची मुले आहेत. अहंकार दाखवाल तर उद्या पालक आणि नागरिकही रस्त्यावर उतरतील. तेव्हा फोकस फक्त अध्यक्षांवर नाही, तर सरकारवर असेल. आज सायंकाळपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा उद्याचे आंदोलन सरकारला परवडणारे नसेल,” असा इशारा देखील दिला.
आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा तसेच विविध मागण्यासंदंर्भात गेल्या आकरा दिवसांपासून पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धार हळूहळू तीव्र होत चालली असून, विविध राजकीय पक्ष व व्यक्तींकडून त्याला पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, आंदोलनासंदंर्भात पुणे पोलिसांनी नुकतेच दोन वेगवेगळे गुन्हे नोंद केले. परंतु, त्यात रोहित पवार यांचे नाव वगळण्यात आले. त्यानंतर रोहित पवार यांनी थेट पोलिस ठाणे गाठत माझ्यावरही गुन्हा नोंदवा असे म्हणत पोलिसांना धारेवर धरले होते.
यापार्श्वभूमीवर रविवारी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला निरवाणीचा इशारा दिला. ते म्हणाले, पुणे, मुंबई आणि दिल्लीतील कारवाईचा संदर्भ देत पवार म्हणाले, “महाराष्ट्र पोलिसांबद्दल आदर आहे. मात्र, पुण्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींना हाताळताना चुकीची पद्धत अवलंबल्याने पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. दिल्ली पोलिसांबद्दल वेगळी प्रतिमा आहे, पण महाराष्ट्र पोलिसांकडूनही तसेच होत असेल तर योग्य नाही.” दिल्लीतील आंदोलनावरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. “४० हजार फौजफाटा दिल्लीत लावला आहे. रेल्वे, मेट्रो, पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद आहे. आठ फुटी बॅरिकेड लावले आहेत. दिसेल त्याला उचलले जात आहे. अभिजीत दिपकेला ताब्यात घेतले, त्यांच्या आजीचे निधन झाले तरी फोन करू दिला नाही,” असा आरोप पवार यांनी केला.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिल्लीला जाताना मध्य प्रदेशात ताब्यात घेऊन पुण्यात आणल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. “आम्ही पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थिनींना घरी सोडण्याची विनंती केली. त्यांना सोडले गेले, मात्र विलंबामुळे काहींना त्रास सहन करावा लागला,” असे पवार म्हणाले.
हे सुद्धा वाचा : पिंपरीत भीषण अपघात! ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी
शिष्टमंडळाच्या भेटीत ज्युडिशियल चौकशीची चर्चा झाली होती. मात्र, अध्यक्ष पदावर असताना चौकशी पारदर्शक होणार नाही. त्यामुळे वॉचमनपासून अध्यक्षांपर्यंत चौकशी व्हावी आणि समितीत तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचा समावेश करावा, अशी मागणी असल्याचे पवार म्हणाले. राजकीय आंदोलनाच्या आरोपावर ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी एसीत न बसता विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. आमचे राजकारण समाजकारण आहे.” दुष्काळग्रस्तांना मदत नसताना १२ कोटी ६८ लाखांच्या व्हीआयपी गाड्या आणि लंडनच्या खासगी कार्यक्रमासाठी १० कोटींचा खर्च होत असल्याची टीकाही त्यांनी केली.






