पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना टळली, फटाक्यामुळे गणपतीच्या रथाला लागली आग
राज्यातल्या बऱ्याच भागात लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे. गणेश चतुर्थीला सुरू झालेल्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला म्हणजेच आज होत आहे. पुणे शहरात ठिकठिकाणी गणेश विसर्जनाचा थाट पाहायला मिळतो. गणपती विसर्जनानिमित्ताने रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. पुण्यातील लक्ष्मी रोडचा गणपती विसर्जनासाठी रवाना झाला. या लक्ष्मी रोडच्या गणपतीच्या रथाला अचानक आग लागली. त्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील गणपतीच्या रथाला अचानक आग लागल्याने कार्यकर्त्यांची धावपळ झाली. गणपतीच्या रथाच्या दोन्ही कोपऱ्यांना ही आग लागली. रथाला आग लागल्याने कार्यकर्त्यांनी तातडीने आग विझविली. यामुळे पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतील मोठी दुर्घटना टळली. फटाक्यामुळे गणपतीच्या रथाला आग लागल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर भाविकांनी तातडीने पाण्याचा मारा केला. त्यामुळे पुण्यात गणेशोत्सवादरम्यान सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.