दहीहंडी उत्सव (फोटो- सोशल मिडिया)
नवजात बालकांचे कृष्णाच्या वेशभूषेत छायाचित्रण करण्याचा वाढता कल असल्याने बालकृष्णाच्या पोशाखांना यंदा विशेष मागणी आहे. बाजारात कृष्णाच्या पोशाखांची किंमत २८० ते ३६० रुपयांदरम्यान असून, त्यासोबत बासरी आणि मुकुट दिला जातो. राधेच्या पोशाखांची किंमत १५० ते ४७० रुपयांपर्यंत आहे. फ्री-साइज पोशाख ९०० रुपयांपासून उपलब्ध आहेत, अशी माहिती विक्रेते संजय रंका यांनी दिली.
Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस
जन्माष्टमीसाठी एकदाच वापरल्या जाणाऱ्या पोशाखांऐवजी ते भाड्याने घेण्याकडेही पालकांचा कल आहे. दहा वर्षांखालील मुलांच्या कृष्णाच्या पोशाखाचे एक दिवसाचे भाडे ५५० रुपये, तर दहा वर्षांवरील मुलांसाठी ६५० रुपये आहे. राधेचा पोशाख ५५० रुपयांना भाड्याने मिळतो. केवळ पोशाख घ्यायचा असल्यास ४५० रुपये आकारले जातात, अशी माहिती विक्रेते रितेश कासवाल यांनी दिली.
दहीहंडीसाठी लागणाऱ्या आकर्षक मडक्यांचीही बाजारात मागणी वाढली आहे. यंदा मडक्यांच्या दरात सुमारे ५० रुपयांची वाढ झाली आहे. रंग, थिनर आणि सजावटीसाठी लागणाऱ्या खड्यांच्या दरात वाढ झाल्याने मडक्यांच्या किमती वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. बाजारात मडक्यांची सुरुवातीची किंमत सुमारे १०० रुपयांपासून आहे. मडक्याचा आकार, नक्षी आणि सजावटीनुसार किंमत वाढते.
ऑनलाइन खरेदीचे पर्याय वाढले असले तरी अनेक पालक मुलांना सोबत घेऊन बाजारात येत आहेत. मोबाईलवर कृष्णाचे फोटो पाहणारी मुले प्रत्यक्ष दुकानात बासरी, मुकुट आणि मोरपिस हातात घेऊन त्यांची निवड करत आहेत. त्यामुळे डिजिटल युगातही कृष्णाशी जोडलेल्या पारंपरिक वस्तूंचे आकर्षण कायम असल्याचे विक्रेत्यांचे निरीक्षण आहे.
जन्माष्टमीच्या बाजारातील दर
वस्तू. यंदाची किंमत/भाडे
कृष्णाचा पोशाख. ₹२८० ते ₹३६०
राधेचा पोशाख. ₹१५० ते ₹४७०
फ्री-साइज पोशाख. ₹९०० पासून
कृष्ण पोशाख भाडे (१० वर्षांखालील) ₹५५०
कृष्ण पोशाख भाडे (१० वर्षांवरील) ₹६५०
राधेचा पोशाख भाडे. ₹५५०
केवळ पोशाख भाडे. ₹४५०
दहीहंडीचे मडके. ₹१०० पासून






