फोटो सौजन्य- pinterest
ठाण्यातील दहीहंडी म्हटलं की टेंभीनाक्याच्या उत्सवाची चर्चा आवर्जून होते. ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, भगव्या पताका आणि मानवी मनोऱ्यांचा थरार यामुळे टेंभीनाका दहीहंडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.
ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’ चा जयघोष, भगव्या पताकांनी सजलेला परिसर आणि मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवायला ठाणेनगरी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाका दहीहंडी उत्सवाची परंपरा यंदाही तितक्याच दिमाखात साजरी होणार असून, शनिवार, ५ सप्टेंबर रोजी टेंभी नाक्यावर दहीहंडीचा थरार रंगणार आहे. १५१००० रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या महोत्सवात मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र मानाच्या हंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन्ही शहरांतील यशस्वी पथकांना प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. बक्षीस जाहीर होताच त्याच दिवशी रोख स्वरूपात देण्याची टेंभी नाक्याची परंपरा यंदाही कायम राखली जाणार आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांनी मुंबईचा दहीहंडीचा उत्साह ठाण्यात आणून टेंभीनाक्यावरील उत्सवाला वेगळी ओळख मिळवून दिली. आनंद दिघे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा यशस्वीपणे पुढे नेत टेंभीनाक्याच्या हंडीला ठाण्याची ‘मानाची हंडी’ म्हणून नवी ओळख मिळवून दिली. गोविंदांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी यंदा टेंभीनाक्यावर मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार, लोकप्रिय गायक आणि मालिकांमधील तारे-तारका या सोहळ्यास हजेरी लावणार आहेत, महाराष्ट्राची लोककला, लावणीचा ठेका, नेत्रदीपक रोषणाई आणि दर्जेदार ध्वनियंत्रणेमुळे संपूर्ण टेंभीनाका परिसर उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघणार आहे.
ठाणे व मुंबई मानाची हंडी: प्रत्येकी रु. १ लाख ५१ हजार रोख व सन्मानचिन्ह.
महिला गोविंदा पथकः रु.१ लाख रोख पारितोषिक.
७ थरांसाठी: रु.१० हजार
६ थरांसाठी: रु. ७ हजार
५ थरांसाठी: रु.५ हजार
४ थरांसाठी: रु.४ हजार
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






