सौजन्य - नवराष्ट्र टीम
या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये सुरुवातीपासूनच रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनंतर त्यांनी माघार घेतली. त्यामुळे ही जागा भाजपसाठी मोकळी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढत होईल, असे मानले जात होते. मात्र, शिंदेसेनेने अपक्ष सानप यांना पाठिंबा दिल्याने भाजपच्या रणनीतीपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे.
प्रा. सचिन सानप यांची ओळख प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे आहे. त्यांनी पुण्यातील नवरोजी वाडिया महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. तसेच वाडिया आणि मॉडर्न महाविद्यालयांच्या विश्वस्तपदाशीही त्यांचा संबंध राहिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणारे सानप यांचा शैक्षणिक क्षेत्रातील संपर्क आणि विविध राजकीय नेत्यांशी असलेले संबंध त्यांच्या उमेदवारीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत.
सानप यांना पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेची मदत मिळण्याची शक्यता
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षीय ताकदीबरोबरच उमेदवाराचा वैयक्तिक संपर्क, शिक्षकांच्या प्रश्नांवरील भूमिका आणि संघटनात्मक बांधणीला महत्त्व असते. शिंदेसेनेचा पाठिंबा मिळाल्यामुळे सानप यांना पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेची मदत मिळण्याची शक्यता आहे. माघार घेतलेले मंगेश चिवटे आणि शिवसेनेचे पदाधिकारी सानप यांच्या प्रचारात किती सक्रिय होतात, याकडेही लक्ष लागले आहे. दुसरीकडे, भाजपचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यासमोर मित्रपक्षाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष उमेदवाराचे आव्हान निर्माण झाले आहे.
मतांचे विभाजन झाल्यास निकालावर परिणाम होणार
या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान होत असल्याने पहिल्या पसंतीच्या मतांबरोबरच पुढील पसंतीची मतेही निर्णायक ठरू शकतात. प्रमुख उमेदवारांमध्ये मतांचे विभाजन झाल्यास त्याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सानप यांना मिळालेल्या पाठिंब्यामुळे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे गणित बदलणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसमोर अपक्ष म्हणून उभे राहिलेले सानप आता शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे अधिक चर्चेत आले आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराची दिशा तसेच शिक्षक मतदारांचा कल याकडे लक्ष लागले आहे.
Ans: शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने अपक्ष उमेदवार प्रा. सचिन सानप यांना पाठिंबा देण्यात आला आहे.
Ans: भाजपने या मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे.
Ans: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील ‘नंदनवन’ निवासस्थानी १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीला सानप उपस्थित असल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर शिंदेसेनेने त्यांना पाठिंबा दिल्याने राजकीय चर्चेला वेग आला.






