पुणे: विमान वाहतुकीच्या दृष्टीने पक्ष्यांची धडक ही एक गंभीर आणि धोका निर्माण करणारी बाब मानली जाते. अशा घटनांमुळे विमानाचे उड्डाण किंवा लँडिंग अडचणी तर येतात शिवाय विमानाचा अपघात होण्याचीही भीती असते. यामुळे प्रवाशांच्या सेवेवर प्रश्नचिह्न निर्माण होते. ‘डीजीसीए’ ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते जून २५ पर्यंत देशात सर्वात जास्त पक्ष्याची धडक बसण्याची घटना दिल्ली येथील राजीव गांधी विमानतळावर झाली आहे,तर सर्वात कमी घटना पुणे विमानतळावर घडली आहे.दिल्लीत ४१ तर पुण्यात ११ पक्षी धडकण्याची नोंद झाली आहे.
पुणे विमानतळाच्या बाबतीत गेल्या सहा महिन्यांतील आकडेवारी प्रवाशांना दिलासा देणारी आहे. याबाबत बोलतांना लोहगाव विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले, लोहगाव विमानतळाच्या अवकाशात पक्ष्याचे घिरट्या कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले गेले. परिसरातील स्वच्छतेपासून व पर्यावरणाच्या अनुषंगाने देखील प्रयत्न केले गेले. त्याचाच हा परिणाम आहे.
धोका टाळण्यासाठी पुणे विमानतळाची सजगता
विमानाला पक्षांची धडक झाल्यावर काय होते?
विमान लँडिंग किंवा टेकऑफ करताना कमी उंचीवर असल्यामुळे पक्ष्यांशी टक्कर होण्याची शक्यता जास्त असते. तब्बल 90% घटनांमध्ये पक्षी विमानतळाच्या जवळच विमानाला धडकतात. पक्ष्यांच्या धडकेमुळे विमानाच्या इंजिनला नुकसान होण्याची शक्यता असते. काही वेळा इंजिन पूर्णपणे बंद पडते किंवा त्यात आग लागते. रडारद्वारे पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते आणि पायलट्सना यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. तरीही, अचानक समोर आलेल्या पक्ष्यांमुळे गंभीर अपघात होऊ शकतो. पक्ष्यांच्या टक्करांचा धोका टाळण्यासाठी टर्बोफॅन इंजिनचा वापर केला जातो. परंतु तरीही अशा घटना पूर्णतः टाळता येत नाहीत.