
निमसाखर : घोरपडवाडी (ता. इंदापूर) येथील घोरपडवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नंदिकेश्वर शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकून एकहाती विजय संपन्न केला.
रविवारी (दि.२७) घोरपडवाडी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नंदिकेश्वर शेतकरी विकास पॅनल विरुद्ध श्री नंदोबा शेतकरी विकास पॅनल यांच्यामध्ये सरळ लढत झाली. १९५५ सालची स्थापना असलेल्या या सोसायटीची निवडणूक दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेच्या केल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत नंदिकेश्वर शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार निवडून आले. सर्वसाधारण मतदारसंघातून शशिकांत कवितके, अभिजित गोरे, विलास धालपे, अवंतिका नाचण, केशव पिसे, संतोष पिसे, रामदास माने, सचिन लावंड विजय झाले. तर महिला राखीवमधून माळी इंदुबाई शिवाजी, डफळ सिंधुबाई दत्तात्रय या विजय झाल्या.
भटक्या विमुक्तमधून रोहन पिसे तर अनुसूचित मधुन दिगांबर यादव यांचा विजय झाला. इतर मागासवर्गातून शेखर डोंबे हे विजयी झाले. या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मतांनी महिला राखीवमधून इंदुबाई शिवाजी माळी यांनी विजय मिळवला.
विजयी उमेदवारांचे कौतुक
यावेळी सरपंच राजेंद्र चांगण, गजानन लंबाते, युवा उद्योजक अजिनाथ माळी, विठ्ठल माने, हनुमंत लावंड, मारुती नाचण यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.