Pune News: Many flaws in the work of the flyover near the university; Drivers are very unhappy
पुणे : राजभवन ते रिझर्व्ह बँकेदरम्यान दुमजली उड्डाणपुल उभारण्यात आला आहे. दुमजली उड्डाणपुलाच्या कामात अनेक त्रुटी आढळून येत असल्याने वाहनचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. औंध-शिवाजीनगर मार्गावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. असे असले तरी प्रत्यक्षात कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे चित्र समोर येत असल्याचे दिसत आहे.
वाहनधारकांच्या म्हणण्यानुसार पूल सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच रस्त्यावर त्रुटी दिसू लागल्या आहेत. स्वागत फलक देखील पडून आहेत, रस्त्यावर खडी पसरल्याने अपघाताचा धोका वाढला आहे, तर दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनधारकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. पूल चढताना दुचाकीस्वारांना अडचण जाणवत आहे. जोड दिलेल्या ठिकाणी समतल पातळी नसल्याने गाड्या आदळून धक्के बसतात. कडेला घाण साचल्याने पुलाचा परिसर जुना आणि निकृष्ट वाटतो, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रस्त्यावरील जोड योग्य पद्धतीने न दिल्यामुळे नंतर डांबर टाकून ती दुरुस्ती केली गेली आहे, मात्र त्यामुळे उंच-सखल भाग निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता समान पातळीवर नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. परिणामी, अपघाताचा धोका वाढल्याची तक्रार वाहनचालकांनी केली आहे.
सद्यःस्थिती
या संदर्भात पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले की, “पावसामुळे उंच-सखल भाग दुरुस्तीचे काम तात्पुरते थांबले आहे. पाऊस थांबताच डांबर टाकून योग्य पद्धतीने ते काम पूर्ण करण्यात येईल.”
हेही वाचा : ‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..
वाहनचालक अजिंक्य एकाड म्हणाले, “नवीन उड्डाणपूल असूनही तो जुनाट वाटतो. काही ठिकाणी खड्डे, काही ठिकाणी उंचवटे आहेत. अपघाताचा धोका कायम आहे. एवढ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही दर्जेदार पूल न बनवणे दुर्दैवी आहे.” तर जिजाराम मुंडे यांचे मत आहे की, “कामातील त्रुटी इतक्या स्पष्ट दिसत असताना अभियंत्यांनी त्याकडे दुर्लक्ष करणे गंभीर आहे. अजून पाषाण आणि बाणेरकडे होऊ घातलेल्या पुलांवर किमान व्यवस्थित काम करावे.”