विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी
सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी
सराफ बाजारात दिवसभर ग्राहकांची रेलचेल
पिंपरी: साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पिंपरी-चिंचवड शहरातील सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी दिसून आली. सोन्याचे दर उच्चांक गाठूनही सोन्याच्या खरेदीत तेजी कायम असून, सराफ दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील उत्साह दणाणून गेला आहे. बुधवारी (दि. २७) दहा ग्रॅम सोन्याचा दर तब्बल १ लाख १७ हजार रुपये इतका नोंदवण्यात आला. तरीसुद्धा सोन्याला गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानून ग्राहकांनी उत्साहाने खरेदी केली. शहरातील सराफ बाजारात सकाळपासूनच ग्राहकांची पाऊले वळली आणि दुकानदारांना ऑर्डर पूर्ण करण्यास अक्षरशः धावपळ करावी लागली.
सोन्याचे दर उच्चांकावर
पिंपरी-चिंचवड परिसरात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ११,७०० रुपये एवढा पोहोचला आहे. महागाईची झळ बसत असली तरी सोन्याच्या खरेदीवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. उलट दसरा व नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीची मागणी वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजारात उत्सवी वातावरण
सराफ बाजारात दिवसभर ग्राहकांची रेलचेल, दुकानदारांची लगबग आणि दिवाळीसाठी दागिने खरेदी करणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीची चाहूलही लागली आहे.
प्रतिक्रिया
गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यालाच ग्राहकांचा कल अधिक असतो. सध्या महागाई वाढली तरी सोनं भविष्यासाठी हमखास फायदेशीर ठरते. त्यामुळे विजयादशमीसारख्या शुभदिनी खरेदी करणे आवश्यक वाटते.
योगेश नावडे, ग्राहक.
विजयादशमीचा मुहूर्त सोनं, चांदी खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. अनेक ग्राहकांनी आगाऊ बुकिंग केले होते. आजच्या दिवशी विशेष सवलतीसह नवीन डिझाईन्स बाजारात आणली आहेत.
प्रकाश कोठारी, नाकोडा ज्वेलर्स.
दृष्टीक्षेपात
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या खरेदीत २५-३०% वाढ.
पिंपरी-चिंचवडमध्ये सराफ बाजारात ग्राहकांची उत्स्फूर्त गर्दी.
दहा ग्रॅम सोनं – ₹१.१७ लाख, २४ कॅरेट प्रति ग्रॅम – ₹११,७००.