पुणे महापालिका झाली 'मालामाल'; फटाका स्टॉल लिलावातून पालिकेची 83 लाखांची कमाई
पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने फटाक्यांच्या स्टॉल्ससाठी ऑनलाईन लिलावाची प्रक्रिया यंदाही राबवली. या लिलावातून महापालिकेला तब्बल 83 लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. एकूण 192 स्टॉल्सपैकी 125 स्टॉल्सचा यशस्वी लिलाव झाला असून, 68 स्टॉल्स विक्रीअभावी राहिले आहेत.
शहरातील 13 ठिकाणी फटाका स्टॉल्ससाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये शनिवार पेठेतील वर्तक बागेजवळील नदीकाठावरील स्टॉल्सना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी 40 स्टॉल्ससाठी बोली लावण्यात आली आणि एकूण 69 लाख रुपयांची सर्वाधिक बोली येथे लागली. लिलाव झालेल्या प्रमुख ठिकाणांमध्ये शनिवार पेठ रिव्हरसाईड, कोंढवा खुर्द (अग्निशमन केंद्र), हडपसर, धानोरी, कोथरूड, कात्रज, पर्वती, धायरी, खराडी, बालेवाडी, हडपसर (सीझन मॉल), वारजे (आरएमडी कॉलेज) आणि लोहेगाव या परिसरांचा समावेश आहे.
हेदेखील वाचा : Pune News: पुणे महापालिकेत नवी गावं सामील; तरीही का वाढतायेत नागरिकांच्या तक्रारी?
महानगरपालिकेने 2023 पासून फटाका स्टॉल्ससाठी ऑनलाईन लिलाव प्रणाली सुरू केली असून, या पद्धतीमुळे पारदर्शकता वाढली आणि महसूलातही वाढ झाली आहे. यंदा मिळालेले उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत अधिक असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांच्या मते, व्यापाऱ्यांकडून ऑनलाईन लिलावाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रक्रियेमुळे महापालिकेला आर्थिक लाभ होत असून, फटाक्यांच्या विक्रीसाठी नियोजनबद्ध आणि सुरक्षित व्यवस्था निर्माण झाली आहे.
पुणे महापालिका हद्दीत ३४ गावांचा सामावेश
पुणे महापालिका हद्दीत ३४ गावांचा सामावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांवरील कामाचा ताण वाढला आहे. उपनगरातील क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्र वाढले आहे. मनुष्यबळ कमी असल्याने कामे होत नसल्याच्या तक्रारींचा पाढा क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्तांसह आदी कर्मचाऱ्यांनी आयुक्तांपुढे वाचला. त्यामुळे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या संख्येत वाढ करावी लागणार आहे, तसेच मनुष्यबळ वाढविण्यासाठी नोकर भरती करावी लागणार आहे. याचा विचार करुन महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला जाणार आहे.