
Pune: दहीहंडीच्या मंचावर अश्लील हावभाव; पोलिसांचा दणका! ८ डान्सर्ससह पुण्यातील आयोजकांवरही कारवाई
राधा पाटीलनंतर इतर डान्सर्सवरही कारवाई
पुण्यातील दहीहंडी कार्यक्रमातील नृत्यप्रकारावरून यापूर्वी प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील हिच्यावरही पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर आता सहकारनगर पोलिसांनी इतर नृत्यांगनां विरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांच्यासह आठ नृत्यांगनांचा या कारवाईत समावेश आहे.
मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारीही सहआरोपी
पोलिसांनी केवळ नृत्यांगनांवर कारवाई न करता संबंधित कार्यक्रमांचे आयोजक आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई केली आहे. कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात आली होती का, परवानगीतील अटींचे पालन झाले का, तसेच अश्लील गाणी आणि आक्षेपार्ह नृत्यप्रकारांना आयोजकांची संमती होती का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
नियमभंगाचीही चौकशी
अश्लील गाणी वाजवणे, कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे तसेच विनापरवाना किंवा परवानगीतील अटींचा भंग करून कार्यक्रम आयोजित करणे, या विविध बाबींच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली आक्षेपार्ह प्रकार होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे. या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता लक्ष लागले आहे.