Split in anti-Ola-Uber strike
Ola-Uber Strike: ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या मोबाईल अॅप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या संपात फूट पडल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी संपातून माघार घेण्याची घोषणा केली. त्यानंतर इतर अन्य टॅक्सी संघटनांनीही यामध्ये पाठिंबा दर्शविला आहे.
आज सकाळपासून पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर यासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रिक्षाचालक संघटनांकडून हा संप पुकारण्यात आला होता. या कंपन्या प्रवासी वाहतुकीसाठी राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून करण्यात आला होता. विशेषतः पुणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) समितीने निश्चित केलेल्या दरांपेक्षा कमी दरात सेवा देऊन पारंपरिक चालकांचे आर्थिक नुकसान केल्याचा मुद्दा आंदोलनात मांडण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत आंदोलक संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका घेत, समस्येवर उपाय काढण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी मागितला. त्यांच्या या आश्वासनानंतर महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि काही प्रमुख संघटनांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात बोलताना बाबा कांबळे म्हणाले की, “रिक्षा-टॅक्सी चालकांचे हातावरचे पोट आहे. त्यांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे. सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने आणि चर्चेला संधी देणे गरजेचे असल्याने आम्ही सध्या तरी संप मागे घेत आहोत.” त्याचबरोबर शासनासोबत चर्चा सुरू असताना विनाकारण बंद किंवा आंदोलन पुकारणे योग्य नाही. चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघावा यासाठी त्यांनी सरकारला वेळ दिला आहे, असंही संघटनांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, काही संघटनांनी बंदमध्ये सहभागासाठी चालक आणि मालकांवर दबाव टाकल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मते, “काही संघटना दादागिरी करून जबरदस्तीने संपात सहभागी होण्यास भाग पाडत आहेत. पोलिस प्रशासनाने अशा प्रकारांवर लक्ष ठेवून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी,” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये ओला-उबेरसारख्या अॅप आधारित भाडेवाहतूक कंपन्यांविरोधात रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी पुकारलेला संप पुकारण्यात आला होता.त्यामुळे राज्यातील विविध मोठ्या शहरात प्रवाशांचीही मोठी गैरसोय झाली. ओला, उबेर यांच्याविरोधात प्रस्थापित वाहनचालक संघटनांनी एकत्र येत निषेध नोंदवला. त्यांच्या म्हणण्यानुसार, या कंपन्यांमुळे पारंपरिक रिक्षा व टॅक्सी व्यवसाय धोक्यात आला आहे.
मात्र या संपात आता फूट पडली असून महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि काही प्रमुख टॅक्सी संघटनांनी संपातून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संपाचे स्वरूप आणि त्याचा प्रभाव आता मर्यादित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रवाशांना या संपामुळे काही प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शासनाने अद्याप या मुद्द्यावर कोणतीही ठोस मध्यस्थी केली नसल्याचे सांगितले जात आहे.