अधिवेशन काळातच मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' महत्त्वपूर्ण घोषणा; आश्वासन देत म्हटलं... (फोटो- महाराष्ट्र विधानसभा)
मुंबई: काल विधानसभेत काँग्रेसचे नेते नाना पाटोळे यांनी एक पेनड्राइव्ह बॉम्ब फोडला. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातले मंत्री, मोठे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, हनी ट्रॅपची केंद्रं बनली आहेत. यासंदर्भातील माझ्याकडे पेन ड्राइव्ह आहे आणि सरकारचं मत असेल तर आम्ही तो दाखवू शकतो, असं नाना पटोले यांनी म्हटले होते. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावात बोलताना उत्तर दिले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
कालपासून एक गोष्ट या सभागृहात मांडली जात आहे. ती म्हणजे हनी ट्रॅप. आता कुठला हनी ट्रॅप यांनी आणला ते समजतच नाही. नाना पटोले यांनी कोणता बॉम्बच आणला म्हणे. तो बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. तुमच्याकडे असला तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना. ना हनी आणि ना ट्रॅप आहे. नाना पटोले, कोणती घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. आता आजी-माजी मंत्री सगळे एकमेकांकडे पाहत आहेत. कोणत्याही आजी-माजी मंत्र्यांची हनी ट्रॅपबाबत तक्रारही नाही. पुरावेही नाहीत जाणीव अशी घटनाही समोर आलेली नाही.
या संदर्भात एक तक्रार या ठिकाणी आली होती. नाशिकमधून एका महिलेने तक्रार केली होती. मात्र त्यांनी ती तक्रार मागे घेतली. आपण सातत्याने हॉटेल, हॉटेल मालकाचा उल्लेख करताय, ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे. अशा प्रकारे सभागृहाचा वेळ घालवणे, सभागृह सोडून जाणे, त्याग करणे योग्य नाही. नीट पुरावे आणायचे, जोरदार मांडायचे. सत्तारूढ पक्षाला बोलती बंद करून टाकायची.
काय म्हणले होते नाना पटोले?
राज्यातील काही मंत्री, ७२ हून अधिक अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. हनीट्रॅप करणाऱ्यांची गोपनीय माहिती गोळा केली जात आहे. तसेच काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं असून त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा विचार केला. सरकार यावर काही बोलायला तयार नाही. त्यामुळे आज मी हा विषय विधानसभेत मांडत आहे.
हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्याची महत्त्वाची कागदपत्रं अँटी सोशल मुव्हमेंटच्या हाती चालली आहेत. मला कुणाचंही चारित्र्यहनन करायचं नसून या सगळ्याबाबत सरकार गंभीर नाही. साधं निवेदनही द्यायला तयार नाही. त्यामुळे अध्यक्षांनी याबाबत निर्देश द्यावेत, अशी विनंती नाना पटोलेंनी केली.
या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, “या तक्रारीबद्दल मला माहिती नाही. पण, नाशिकसारख्या पुण्यभूमीचं नाव अशा प्रकरणांमध्ये यावं हे दुर्दैव आहे. हे सर्व ज्या व्यक्तीच्या नावाभोवती फिरतंय, त्या व्यक्तीचं राजकीय संबंध, राजकीय वर्तुळातील वागणूक पाहता महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे, हे कळत नाही. केवळ पैसे कमावण्यासाठी माणूस कोणत्या पातळीवर घसरतोय? कोणत्या अनैतिकतेचा वापर करतोय? हे सर्व धक्कादायक आणि दुःखद आहे.” आता नाना पटोले यांनी विधानसभेत पेन ड्राइव्ह दाखवला आहे. ज्यानंतर सरकार काही भूमिका घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.