सौजन्य - नवराष्ट्र टीम
कारखान्याच्या युनिट क्रमांक १ चा हा ७१ वा, तर युनिट क्रमांक २ चा १० वा गळीत हंगाम आहे. गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ज्येष्ठ सभासद दादासाहेब जाधव, विश्वासराव रुपनवर, शहाजी शिंदे, दत्तात्रेय धापटे, सतीश काटे आणि तानाजी मुळीक यांच्या हस्ते ऊसाची मोळी टाकण्यात आली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर, संचालक कैलास गावडे, अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, निलेश टिळेकर, संतोष मासाळ, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, हणमंत घोळवे, सत्यवान चव्हाण आणि कार्यकारी संचालक अशोक जाधव उपस्थित होते.
गळीत हंगामाच्या तयारीबाबत अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर यांनी सांगितले की, कारखान्याची हंगामपूर्व तयारी पूर्ण झाली असून, गाळपाला सुरुवात करण्यात आली आहे. यंदा ११ लाख टन ऊस गाळपाचा टप्पा गाठण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सभासदांनी कारखान्याला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ऊस दराच्या स्पर्धेत छत्रपती मागे राहणार नाही
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील राहणार आहे. परिसरातील इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर देण्यात येईल आणि दराच्या स्पर्धेत छत्रपती कारखाना मागे राहणार नाही, अशी ग्वाही संचालक मंडळाने दिली. सभासदांनी तसेच गेटकेनच्या शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस छत्रपती कारखान्याला द्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
गेटकेन आणि सभासदांना समान दर
गेटकेन क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याशी जोडण्यासाठी विविध ठिकाणी कार्यालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी इंदापूर शहरात, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेलगाव आणि माळशिरस येथे, तर फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दहिगाव येथे कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. छत्रपतीचे सभासद आणि गेटकेनमधून ऊस पुरवठा करणारे शेतकरी यांना समान दर दिला जाणार असल्याचे संचालक मंडळाने स्पष्ट केले.
‘वजन चोख… पैसे रोख…’
शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी कारखान्याने ‘वेळेत धन… हजार किलोचाच टन… वजन चोख… पैसे रोख… छत्रपतीला ऊस घाला बिनधोख…’ अशी नवी टॅगलाइन तयार केली आहे. कारखान्याचे वजनकाटे अचूक असून, गेटकेनच्या शेतकऱ्यांना वजनाबाबत खात्री करण्यासाठी कोणत्याही वजनकाट्यावर ऊसाचे वजन करून तो कारखान्याकडे आणता येईल. याबाबत कारखान्याची कोणतीही हरकत राहणार नाही, असे संचालक मंडळाने सांगितले. पारदर्शक वजन, वेळेत पैसे आणि स्पर्धात्मक ऊस दर या मुद्द्यांवर भर देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी छत्रपती कारखान्याला ऊस पुरवठा करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Ans: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि. ११ ऑक्टोबर) ज्येष्ठ सभासद आणि संचालक मंडळाच्या हस्ते ऊसाची मोळी टाकून करण्यात आला.
Ans: कारखाना प्रशासनाने यंदाच्या गळीत हंगामात ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Ans: श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना प्रशासनाने सभासद आणि गेटकेनच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकसमान दर देण्याची ग्वाही दिली आहे. तसेच ‘वजन चोख... पैसे रोख...’ या घोषवाक्याद्वारे अचूक वजन आणि वेळेत पैसे देण्यावर भर देण्यात आला आहे.






