जळगाव: ‘चांगल्या मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचे एवढेच काम महिला आयोग अध्यक्ष करत आहेत,” अशा शब्दांत निशाणा साधत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. पुण्यासह राज्यभरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने रोहिणी खडसे यांच्या नेतृत्त्वात पुण्यात आंदोलन करण्यात आले, या वेळी त्यांनी रुपाली चाकणकरांवर जहरी शब्दांत टिका केली आहे.
राज्यात आणि देशात महिला अत्याचार वाढत आहेत महिला आज कुठेही सुरक्षित नाहीत याचा निषेध करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रस्त्यावर उतरुण आंदोलन केले. मंत्र्यांचे तर खरे सत्कार केले पाहिजेत रोज उठायचे आणि महिलांच्या बाबतीत अपशब्द काढायचे काम करत आहेत, गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करते, पर्समध्ये रामपुरी चाकू ठेवा, मिरची पावडर ठेवा आणि तुमचे तुम्ही संरक्षण करा.
कधीकाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर आणि ‘ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट’ म्हणून ओळखले जाणारे पुणे आता हिंसेचे माहेरघर आणि गुन्हेगारीचे केंद्र बनत चालले आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केला आहे.गेल्या काही दिवसांपासून पोर्शे कार अपघात, कोयता गँग, दिवसाढवळ्या गोळीबार, चेन चोरी, बलात्कार, विनयभंग, अपघात आणि खून यांसारख्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः लहान मुलांकडे पिस्तूल आणि कोयते सापडणे, किरकोळ कारणांवरून खून होणे आणि अमली पदार्थांचा सुळसुळाट ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, कारण त्यांच्या कार्यकाळात परिस्थिती अधिकच बिघडली आहे, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. “पोलीस प्रशासनावर गृहमंत्र्यांचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. पुणे आता दहशतीचे माहेरघर बनले आहे,” असे खडसे यांनी स्पष्ट केले.
पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असतानाही पोलीस प्रशासन ठोस कारवाई करण्यास असमर्थ ठरत आहे. यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव आहे का? किंवा प्रशासन निष्क्रिय झाले आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी सरकार कोणती ठोस पावले उचलणार? तसेच, शहर पुन्हा सुरक्षित कसे होईल? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
खडसे यांनी महिला आयोगाच्या निष्क्रियतेवर सवाल उपस्थित करत म्हटले की, “पुण्यात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत, पण महिला आयोगाने यावर अजूनही चकार शब्द काढलेला नाही.”खडसे यांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, “राज्यातील अनेक मंत्र्यांच्या नावावर महिला अत्याचाराच्या तक्रारी आहेत. पण महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांचा राजीनामा मागणार नाहीत. त्या फक्त अशा नेत्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत.”
महिला आयोगाच्या कामगिरीवर टीका करत खडसे म्हणाल्या, “त्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाहीत, तर फक्त सत्ताधारी पक्षातील नेत्यांची बाजू घेण्यासाठी त्या अध्यक्ष आहेत.”या आंदोलनानंतर राज्यात महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर नवा वाद उफाळण्याची शक्यता असून, महिला आयोग आणि राज्य सरकार यावर काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.