Photo Creidit- Social Media New twist in Satish Bhosale case
बीड: बीडच्या शिरूरमध्ये सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रांवरच आता ॲट्रॉसिटी आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. शालन भोसले यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ढाकणे पिता-पुत्रावर झालेल्या हल्ल्यामुळे बीडमध्ये मोठा संताप उसळला होता. हरिणाची शिकार करताना अडवल्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात ढाकणे पिता-पुत्रांनी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
ढाकणे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी सतीश भोसले याला अटक करण्याची मागणी केली होती. मात्र, आता सतीश भोसलेवर कारवाई न होता उलट ढाकणे पिता-पुत्रावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. “आमच्यावरच गुन्हा दाखल होऊ शकतो,” अशी भीती ढाकणे पिता-पुत्रांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. त्यामुळे आता हा संपूर्ण प्रकार सूडबुद्धीने घडवून आणला गेला आहे का? यावर स्थानिक पातळीवर जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात १९ फेब्रुवारीला दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले होते. मात्र, एपीआय धोरवड यांनी त्यांना हाकलून लावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. तसेच, पोलिसांमध्ये गेल्यावर उलट आपल्यावरच गुन्हा दाखल होईल, अशी भीती ढाकणे पिता-पुत्रांनी व्यक्त केली होती, आणि ती खरी ठरल्याचे दिसत आहे.
शिरूर कासार पोलीस ठाण्यात आदिवासी पारधी समाजातील मुलींना मारहाण आणि छेडछाड केल्याचा आरोप ठेवत ढाकणे पिता-पुत्रांसह अन्य दोघांविरोधात ॲट्रॉसिटी आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हानपुडे पाटील करत आहेत. मात्र, ढाकणे पिता-पुत्रांवरच गुन्हा दाखल झाल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यामुळे आता पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, हा प्रकार सूडबुद्धीने घडवला आहे का? यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.