यंदा साजरे होणार दहा दिवसांचे नवरात्र, काय आहे कारण? : जाणून घ्या सविस्तर
पुणे/ प्रगती करंबळेकर : यंदा नवरात्र दहा दिवसांचे आहे. या वर्षी नवरात्र २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असे दहा दिवसांचे असून प्रत्येकाने कुलाचारानुसार घटस्थापना करून पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरे करावे. ‘आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्राचा आरंभ होतो. या वर्षी २२ सप्टेंबर रोजी नवरात्रारंभ होणार असून, याच दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाईल. साधारणपणे नवरात्र नऊ दिवसांचे असते. परंतु, तिथीच्या क्षय-वृद्धीमुळे कधी ते आठ, तर कधी दहा दिवसांचे होऊ शकते. या वर्षी तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे असणार आहे. गेल्या वर्षीही तृतीया वृद्धीतिथी असल्याने नवरात्र दहा दिवसांचे होते,’ अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
श्री तांबडी जोगेश्वरी
पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये सोमवारी पहाटे साडेपाच वाजता रोहित बेंद्रे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तत्पूर्वी देवीला अभिषेक होणार आहे. त्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
श्री काळी जोगेश्वरी
काळ्या पाषाणामध्ये साकारलेली सुबक मूर्ती असलेल्या बुधवार पेठ येथील श्री काळी जोगेश्वरी मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने शारदीय नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. दररोज सकाळी षोडशोपचार पूजा, सप्तशती पाठ, श्रीसुक्त पठण, जोगवा, नवचंडी होम, असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. देवी दररोज वेगवेगळ्या वाहनावर आरूढ होणार आहे.
श्री पिवळी जोगेश्वरी
शुक्रवार पेठेतील पिवळी जोगेश्वरी मंदिरात विधीवत पद्धतीने घटस्थापना आणि पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा होणार आहे.
श्री भवानी देवी
भवानी पेठेतील श्री भवानी देवी मंदिरात सकाळी सहा वाजता महारुद्राभिषेक आणि महापूजा होणार आहे. त्यानंतर तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन होणार असून सकाळी अकरा वाजता घटस्थापना होणार आहे. उत्सवकाळात दररोज ललिता सहस्रनाम पठण, श्रीसुक्त पठण होणार असून, दिवसभर विविध भजनी मंडळे भजनसेवा रुजू करतील.
महालक्ष्मी मंदिर
सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात सोमवारी गोपालराजे पटवर्धन आणि पद्माराजे गोपालराजे पटवर्धन यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता घटस्थापना होणार आहे. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षे झाल्याचे औचित्य साधून पहिल्याच दिवशी दुपारी साडेचार वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्री देवी चतु:शृंगी
सेनापती बापट रस्त्यावरील श्री देवी चतु:शृंगी मंदिरात पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा होणार असून, मंदिराच्या आवारात दर वर्षीप्रमाणे जत्राही भरणार आहे. मंदिर व्यवस्थापक विश्वस्त रवींद्र अनगळ यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना होणार आहे. देवीला मंगलस्नान, सुक्ताभिषेक, रुद्राभिषेक करून देवीची सालंकृत षोडषोपचार महापूजा करून देवीला महावस्त्र अर्पण करण्यात येणार आहे.