संग्रहित फोटो
पवार कुटुंबाच्या प्रतिष्ठेची निवडणूक
अजित पवार यांच्या नेतृत्वाशी जोडले गेलेले सोमेश्वर कारखान्याचे राजकारण त्यांच्या निधनानंतर नव्या वळणावर आले आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गटासाठी ही निवडणूक कारखान्यावरील राजकीय वर्चस्व कायम राखण्याची कसोटी आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने केलेल्या कामांचा वारसा आणि सभासदांचा विश्वास या मुद्द्यांवर सत्ताधारी गटाची भिस्त आहे. मात्र, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र भूमिका घेत ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ उभे केल्याने सत्ताधारी गटासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भाजपचे माजी आमदार संजय जगताप यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या सहकार्यामुळे या पॅनेलची ताकद वाढल्याचा दावा केला जात आहे. ‘शेतकरी हाच आमचा पक्ष’ ही भूमिका मांडत जगताप यांनी स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
युगेंद्र पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या सहभागामुळे या निवडणुकीला पवार विरुद्ध पवार असा राजकीय आयाम मिळाला आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजी, नेतृत्वाविषयीची नाराजी आणि सभासदांचे वैयक्तिक संबंध यांचा मतदानावर किती परिणाम होतो, हे निर्णायक ठरणार आहे.
ऊस उत्पादकांचा कौल महत्त्वाचा
ऊसदर, वेळेवर होणारी ऊसबिले, कारखान्याचे आर्थिक व्यवस्थापन, गाळप क्षमता आणि सभासदांच्या हिताचे निर्णय हे मुद्देही निवडणुकीत महत्त्वाचे आहेत. केवळ राजकीय समीकरणांवर नव्हे, तर कारखान्याच्या कामकाजाबाबत सभासदांच्या मनात असलेल्या समाधानावरही निकाल अवलंबून राहणार आहे. तिन्ही बाजूंकडून विजयाचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष मतदानातून कोणाला कौल मिळतो, हे आज स्पष्ट होईल. सुनेत्रा पवार आपले वर्चस्व कायम राखणार, पुरुषोत्तम जगताप स्वतंत्र पॅनेलच्या बळावर बाजी मारणार की युगेंद्र पवारांच्या भूमिकेमुळे निकालाला अनपेक्षित कलाटणी मिळणार, याचे उत्तर सभासदांच्या मतदानातून मिळणार आहे.
प्रचाराच्या सांगता सभेत तिन्ही पॅनल कडून शक्तीप्रदर्शन
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रचाराची सांगता सभा शुक्रवारी (दि ९) झाली. सत्ताधारी गटासह तिन्ही पॅनल कडून मोठे शक्ती प्रदर्शन करून विजयाचे दावे प्रति दावे करत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, उत्सुकता शिगेला पोहचली आहे.






