अहमदनगर: राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताफ्यातील कारला भीषण अपघाच झाल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी (30 ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. विखे पाटील यांचा ताफा संगमनेर तालुक्यातून जात असताना ताफ्यात भरधाव कार समोरून येणाऱ्या एका वाहनाला धडकली. हा अपघात इतका भयानक होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला.
या अपघातात कारमधील दोन पोलीस कर्मचारी गंंबीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा समनापूरहून संगमनेकडे निघाला होता. त्याचवेळी त्यांच्या ताफ्यातील पोलिसांची कार समोरून येणाऱ्या एका वाहनाला जोरदारपणे धडकली. अपघातात कारमधील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याने त्यांना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातात महिला अधिकारी पडवळ यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याची माहिती आहे. तर या अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनीही अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेत बचावकार्यास मदत केली. रात्री उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.