फोटो सौजन्य - pinterest
नवी मुंबईत पहाटेपासून रिमझिम सुरु असणाऱ्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुपारच्या सत्रांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळांना 11 वाजता घरी सोडण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास नवी मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचण्याची शक्यात आहे. सततच्या पावसामुळे काल नवी मुंबईतील अनेक भागांत पाणी साचलं होतं. पाण्यातून वाट काढताना नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत होता. आज देखील नवी मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज देखील नवी मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हेदेखील वाचा – मुंबई उपनगरात दमदार पावसाची हजेरी; रस्ते जलमय; वाहतूक सेवा विस्कळित; नागरिकांचे हाल
पावसाचा वाढता जोर पाहता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच हवामान विभागाने आज मुंबई आणि नवी मुंबई क्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासानाने शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर सकाळच्या सत्रातील शाळांना जिथे पाणी भरते अशा शाळेतील विद्यार्थ्यांना 11 वाजता सोडण्याचे आदेश दिले आहेत. सततच्या पावसामुळे रेल्वे रुळावर देखील पाणी साचण्यास सुरुवात झाल्याचं चित्र आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशारीने सुरु आहे. त्यामुळे नागिरकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी जमली आहे. अशातच रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचं देखील सांगितलं जात आहे. पाऊस आणि सिग्नल यंत्रणेतील बिघाड यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
हेदेखील वाचा – Breaking: ग्रँट रोड वेस्टर्न रेल्वे स्टेशनजवळील G+4 इमारतीचा वरचा भाग कोसळला
पहाटेपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वेला बसला आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. तर हार्बर रेल्वे मार्गावरील लोकसेवा 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरु आहे. मुसळधार पावसाचा फटाका पश्चिम रेल्वेला देखील बसला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वेची वाहतूक देखील 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वेवर झाला आहे. सकाळच्या वेळा कामावर जाणाऱ्या नागरिकांची लगबग सुरु असते. पण रेल्वेसेवाच संथ गतीने सुरु असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.