Raj Thackeray : 'ना शिवसेना शिंदेंची ना राष्ट्रवादी अजित पवारांची'; डोंबिवलीतील सभेतून राज ठाकरे कडाडले
देशात आणि राज्यात कित्येक वर्षांपासून फोडाफोडीचं राजकारण केलं जात आहे. मात्र कोणी कोणाचा पक्ष आणि चिन्ह पळवलं नव्हतं, पण आज ते उभ्या महाराष्ट्राला बघावं लागत आहे. कितीही राजकीय आणि वैचारिक विरोध असला तरी शिवसेना ना एकनाथ शिंदेंची ना राष्ट्रवादी अजित पवारांची, बाळासाहेब ठाकरे यांची आणि शरद पवार यांनी हे पक्ष उभे केले आणि वाढवले, त्यामुळे ती त्याची अमानत आहे. सत्तेसाठी एकमेकांच्या मांडीवर बसणाऱ्यांची नाही, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे.
हेही वाचा-Video: “मविआत गेले अन् ‘हिंदूहृदयसम्राट’ काढून थेट जनाब…”; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
पक्ष, विचारांशी काहीही देणं घेणं राहिलं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, पण ४० आमदार एकनाथ शिंदे कधी गेले समजल नाही. मुख्यमंत्र्यांना सर्व गोष्टींची माहिती असते, मात्र सर्व आमदार गुवाहटीला निसर्ग पहायला गेले. एकनाथ शिंदे नंतर भाजपसोबत गेले. मात्र भाजप ज्यांच्यासोबत माडींला मांडी लागून बसणं म्हणजे श्वास गुदमरतो असं म्हणत होते. तेच अजित पवार यांच्या मांडीवर येऊन बसले. आता त्यांचा श्वास गुदमरत नाही. कोण कुठे चाललंय थांग पत्ता लागत नाही.
आमचा राजू विधानसभेत एकटा होता. मात्र आमचा आमदार टिकणारा होता, विकणारा नव्हता. अशा गोष्टी आमच्या सहकाऱ्यांना शिवत नाहीत. शिवसेना आणि भाजपसमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती. २०१९ साली निवडणूक झाली. त्यानंतर एक सकाळचा शपथविधी झाला. ते लग्न पंधरा मिनिटात तुटलं. काकांनी डोळे वटारले आणि त्यानंतर काका मला माफ करा, असे म्हणत घरी आले, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.
फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवार यांनी केली. १९७८ मध्ये शरद पवारांनी कॉंग्रेस फोडली, त्यानंतर १९९२ मध्ये शिवसेना फोडली आणि नंतर २००५ मध्ये नारायण राणेंना फोडलं काही आमदार तिकडे नेले. देशाला दिशा देणारं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे, मात्र आता कोणता आदर्श घ्यावा. उत्तर प्रदेश बिहारमध्ये असले प्रकार होत होते. आता महाराष्ट्राला पण त्या रांगेत या राजकारण्यांनी नेवून ठेवलं आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र टिकण गरजेचं असून महाराष्ट्र बरबाद झाला तर छत्रपतींचं नाव घेता येणार नाही. महाराष्ट्रात एवढे प्रश्न प्रलंबित असतात मात्र यांची चेष्टा मस्करी सुरू आहे. महाराष्ट्रासाठी जागे रहा, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचा आहे. म्हणून एकदा महाराष्ट्र माझ्या हातात द्या असे आवाहन राज ठाकरे यांनी उपस्थितांना केले.