मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची डोंबिवलीमध्ये प्रचारसभा (फोटो-ट्विटर)
डोंबिवली: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान दिवाळी संपताच प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. दरम्यान आज राज ठाकरे यांनी डोंबिवली येथे मनसेच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. विद्यमान आमदार राजू पाटील यांना मनसेने डोंबिवलीमधून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
डोंबिवली येथील प्रचार सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “राज्यातील राजकारणात युती आणि आघाडीमध्ये कशाचाच ताळमेळ नाही. २०१९ मध्ये निवडणुका झाल्या. निकाल लागला आणि त्यात एक सकळचा शपथविधी झाला. काकांनी डोळे वटारल्यामुळे ते लग्न १५ मिनिटांत मोडले. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवल्या त्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे जाऊन बसले. अमित शहा यांनी अडीच मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिल होता, या कारणांमुळे ते तिकडे गेले. उद्धव ठाकरेंच्या समोर नरेंद्र मोदी यांनी संगितले होते की, आमचे पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील. अमित शह यांनी टेक सांगितले. तेव्हाच त्यांनी आक्षेप का नाही घेतला? ” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेससोबर गेल्यावर सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे, सर्व फोटोमध्ये बाळसाहेब ठाकरे यांच्या आधीचे हिंदूहृदयसम्राट हे विशेषणच काढून टाकले. त्यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट करायला कोणीही तयार नाही. मी तर काही उर्दू फोटो पाहिलेत. त्यात त्याच्या आधी बाळसाहेबांच्या आधी जनाब असे लिहिलेले होते. स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी एवढ्या खालच्या पातळीवर गेले. महाविकास आघाडीत गेले आणि हिंदूहृदयसम्राट नाव काढून थेट जनाब बाळसाहेब ठाकरे असे लिहायला सुरुवात झाली. ”
“विचार नावाची गोष्टच नाहीत उरली. मग हे कॉँग्रेससोबत गेले, अडीच वर्षे संपली. हे इकडे पाहत होते. खालच्या खाली ४० आमदार गेले. मुख्यमंत्र्यांना माहितीच नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सोबत राहणे अवघड होत असल्याचे सांगून एकनाथ शिंदे गेले. मात्र आता अजित पवार पुन्हा जवळ आले. आता काही करता येत नाही. राज्यात अनेक प्रश्न आहे. हे फक्त मजा करत आहेत. हे तुम्हाला गृहीत धरत आहेत.”
राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या प्रचारसभेत महाविकास आघाडी, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. मात्र भाजपवर टीका करताना त्यांनी थोडासा हात आखडता घेतल्याचे पाहायला मिळाले. राज्यात प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. २० तारखेला राज्यात मतदान होणार आहे तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. तसेच निवडणून येणाऱ्या जागांवरच मी सभा घेणार असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे डोंबिवलीची जनता पुन्हा एकदा राजू पाटील यांना संधी देणार का हे पहावे लागणार आहे.