
बुलडाणा : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही राजकीय वारेही फिरू लागले आहे. सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर विदर्भाच्या राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा जवळपास सुपडा साफ झाला. त्यानंतर ऱाष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाकडे इच्छुकांचा ओढा वाढला आहे. अशातच अजित पवार गटात असलेले डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात डॉ. शिंगणे यांना घरातूनच आव्हान मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी विधानसभ निवडणुकीत डॉ. शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांना पाठबळ देत घरातूनच आमदार शिंगणे यांना आव्हान देण्याचा डाव टाकला आहे. त्यामुळे बुलडाण्याच्या सिंदखेडराजा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीतही काका-पुतणीची लढाई पाहायला मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या 25 वर्षांपासून डॉ. राजेंद्र शिंगणे हे एक सिंदखेडराजा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत. पण इतकी वर्षे या मतदारसंघात कामेच झाली नसल्याचा आरोप गायत्री शिंगणे यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर साखर कारखाना आणि सूत गिरणीही बंद पडल्याचा आरोप गायत्री शिंगणे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर डॉ. राजेंद्र शिंगणे हे अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सामील झाले. त्यामुळे सिंदखेडराजा मध्ये गायत्री शिंगणे यांच्या रुपाने शरद पवार यांच्या गटाला एक तरूण चेहरा मिळाला आहे. गायत्री शिंगणे या शरद पवार यांच्या गटाच्या जिव्हा कार्याध्यक्ष आहेत.त्यातच शरद पवार यांनी ताकद दिल्यामुळे आता गायत्री शिंगणे यांनीदेखील विधानसभेत रणशिंग फुंकण्याची तयारी सुरू केली आहे.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मी आतापर्यंत दोनदा भेटले असून त्यांच्याकडून मला विधानसभेसाठी सकारात्मक संदेश आला आहे. मतदारसंघातील जनतेलाही नेतृत्वासाठी नवा चेहरा हवा आहे. मतदारसंघातील 50 टक्क्यांहून अधिक जनता माझ्या पाठीशी आहे, अशा भावना यावेळी गायत्री शिंदे यांनी व्यक्त केल्या.