''... जर फरक नाहीच पडला तर तुतारी वाजवू''; रामराजे निंबाळकरांचा 'या' कारणामुळे महायुती सोडण्याचा इशारा
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र जसजसे निवडणुकीचे रण जवळ येत आहे. तसतसे महाविकास आघाडी आणि महायुतीतील नाराजीनाट्य बघयला मिळत आहेत. यामध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे ते म्हणजे रामराजे निंबाळकर. अजित पवार फलटण दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्त आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. आपली तक्रार फक्त रणजितसिंह निंबाळकर यांच्याबाबत आहे. जाणून घेऊयात सविस्तर वृत्त.
अजित पवार उद्या फलटण दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी पार पडलेल्या बैठकीत रामराजे निंबाळकर बोलत होते. रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. ”शेवटी काय करायचे ते आपल्या हातात राहिलेले नाही. सरकारला अनेक काम आहेत. भाजपला त्यांचे कार्यकर्ते, प्रशासनाला सांभाळण्याचं काम आहे. आपले भांडण हे भारतीय जनता पक्षासोबत नाही. आपण हिंदू मुस्लिम करत नाही. आपली तक्रार फक्त रणजितसिंह निंबाळकर यांच्याबाबत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. दहशतीला सपोर्ट करू नका. आपली केवळ एवढीच तक्रार आहे. तेवढी सांगून बघू . जर फरक नाहीच पडला तर आपल्याला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही.” या बोलण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांनी महायुतीला एक प्रकारचा इशाराच दिला आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत असलेली तक्रार भाजप श्रेष्टींच्या कानावर घालू. काहीच फरक पडला नाही तर तुतारी वाजवू असा इशाराच रामराजे निंबाळकर यांनी दिला आहे. अजित पवारांनी जेव्हा शरद पवारांची साथ सोडली आणि महायुतीत सामील होण्याचे ठरवले. त्यावेळेस रामराजे निंबाळकर हे अजित पवारांसोबत आले आहेत. मात्र स्थानिक पातळीवर होत असलेल्या अडचणींमुळे ते कदाचित हातात तुतारी घेण्याची शक्यता आहे. म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्यभरात अनेक ठिकाणी महायुतीमध्ये जागावाटप आणि कोणाला कोणती जागा मिळणार यावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. समरजित घाटगे यांनी कागलमध्ये उमेदवारी मिळणार याची खात्री झाल्यामुळे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. इंदापूरची जागा देखील अजित अपवारांकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील देखील तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे. तसेच महायुती आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. कारण तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचे नेते मंडळी नाराज झालेली पाहायला मिळत आहे. वरिष्ठ नेते जरी एकत्रित असले तरी स्थानिक पातळीवर हा तिढा कसा सुटणार याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.