अयोध्या येथे दिनांक २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्ताने चिपळूण नगर परिषदेच्या वतीने शहरांमध्ये विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागाचे नियोजन केलेले आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या सूचनेनुसार शहरातील एक ते पाच श्री राम मंदिरे तसेच अन्य मुख्य ग्राम मंदिरांसह २७ मंदिरांच्या ठिकाणी परिसरामध्ये व पोहोचमार्गाची साफसफाई करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी मंदिर परिसर व मंदिर इमारती नगर परिषदेच्या पाण्याच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करुन स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रसाद शिंगटे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शनानुसार नगरपरिषदेच्या वतीने व स्वच्छ तीर्थ अंतर्गत शहराच्या काविळतळी भागातील मुख्य रस्त्यालगतची गटारे साफ-सफाई करण्याची मोहीम राबविण्यात आलेली आहे. तसेच श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहोळ्याच्या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, आवश्यक त्या ठिकाणी मंडप सुविधा, मंदिरांवरती विद्युत रोषणाई, श्रीराम मंदिरांमध्ये १ मि. २३ सेकंदांनी घंटानाद, मंदिर परिसर व शहराच्या मुख्य ठिकाणी गुढी उभारणे, मंदिरांमध्ये गितरामायण, रामरक्षा, राम नाम जप इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करणे, भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करणे त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये शोभयात्रा रॅली, ढोल पथकांच्या वाद्यासह शोभयात्रेचे आयोजन करणे इत्यादी प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन त्या-त्या ठिकाणी करण्याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे चिपळूण नगर परिषदेच्यावतीने शहरातील मंदिरांच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहाणी करुन कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करण्यात आलेली आहे. त्याकरिता नगर परिषदेकडून नोडल अधिकारी व सहाय्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.
चिपळूण शहरातील श्रीराम मंदिर, पेठमाप, तांबट आळी येथे नियोजित सर्व कार्यक्रमांसह सकाळी १० वाजता शोभायात्रा व दुपारी सर्व उपस्थित ग्रामस्थ व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमांचे आयोजन
श्रीराम मंदिर वाणीआळी या देवस्थानाच्यावतीने पहाटे ५.०० वाजता काकड आरती, सकाळी ७.३० वाजता अभिषेक व गुढी उभारणे, सकाळी ९.०० वाजता भव्य बाईक रॅली, भजन, श्री राम नामजप, दीपोत्सव, महाआरती अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. नगर परिषदेच्यावतीने भाविकांना लाडूचा प्रसाद वितरीत करण्यात येणार आहे. तसेच लक्ष्मी-नारायण देवस्थान, चिपळूण या देवस्थानाच्यावतीने नियोजित कार्यक्रमांबरोबरच श्रीराम विजय या ग्रंथाचे वाचन व पूजन, श्रीराम भक्त कारसेवकांचा सन्मान, विष्णू सहस्र नाम, श्री रामरक्षा, भीमरुपी या स्त्रोत्रांचे सामूहिक पठण, दिपोत्सव अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नगर परिषदेच्यावतीने भाविकांना लाडूचा प्रसाद वितरीत करण्यात येणार आहे. श्रीराम मंदिर, बाजार मारुती मंदिर, बाजारपेठ या देवस्थानाच्यावतीनेही सर्व कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच महाआरतीचे विशेष आयोजन केलेले आहे.
श्रीराम मंदिर पाग जोशी आळी या देवस्थानच्यावतीने विद्युत रोषणाई त्याचबरोबर इतर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांच्यावतीने रामरक्षा व अखंड श्रीराम नाम जपाचे आयोजन केलेले आहे. या ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने लाडूचा प्रसाद देण्यात येणार आहे. या ५ श्रीराम मंदिर, हनुमान मंदीरे व्यवस्थापनाप्रमाणे शहरातील मुख्य ग्राममंदिरे जूना कालभैरव, नवा कालभैरव, श्री. देवी करंजेश्वरी, श्रीदेवी सुकाई, श्रीदेवी विंध्यवासिनी, या ठिकाणी देखील देवस्थानांच्यावतीने विद्युत रोषणाई व विविध धार्मिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. आयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहोळ्यामध्ये स्त्रोत्रपठण, रामरक्षा, ग्रंथवाचन व रामराज्य २०२४. अशा विषयांवर व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आलेले आहे, असे मुख्याधिकारी श्री. शिंगटे म्हणाले.
संपूर्ण शहरामध्ये २२ जानेवारी रोजी सोहोळ्याच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण असून देवस्थानांचे व्यवस्थापक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विविध पक्षांचे पदाधिकारी, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रामध्ये प्रभावीपणे काम करणाऱ्या सामाजिक संघटना व सामाजिक संस्था व त्यांचे पदाधिकारी, नगर परिषदेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, नगरपरिषद प्रशासन, महसूल व पोलीस प्रशासन, सर्व पत्रकार या सर्वांच्यावतीने सर्वचजणांनी सहभाग घेतला जात आहे, असे श्री. प्रसाद शिंगटे म्हणाले. मंदिर परिसरामध्ये व मुख्य चौकात या धार्मिक सोहोळ्याचे वातावरण निर्मितीसाठी नगर परिषदेच्यावतीने गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व सामाजिक, राजकीय संघटनांचे सन्माननीय आजी-माजी लोकप्रतिनिधी, व्यापारी व नागरिक यांनी आपल्यावतीने सहभाग नोंदवून सहकार्य कराधे, अशी नगर परिषद प्रशासनाच्यावतीने त्यांनी विनंती केली आहे.