मालमत्ता कराच्या नोटिसांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम, घरपट्टी कराबाबत विशाल भोसले यांचं स्पष्टीकरण
चिपळूण नगरपरिषदेत मालमत्ता कराबाबत करण्यात आलेल्या नव्या सर्वेक्षणामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. नेमकं या प्रकरणावर प्रशासन काय म्हणतंय जाणून घ्या.
चिपळूण (प्रतिनिधी): नगरपरिषद आणि रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. नव्या सर्वेक्षणानुसार हातात पडलेल्या मालमत्ता कराच्या नोटिसांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याचपार्श्वभूमीवर प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. घरपट्टी करामध्ये कोणतीही वाढ झालेली नसल्याची माहिती चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली आहे. या करात कोणाची हरकत असल्यास २८ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट करतांना कोणावरही चुकीच्या पद्धतीने अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देखील भोसले यांनी दिली आहे.
चतुर्थ वार्षिक कर आकारणी संदर्भात चिपळूण नगरपरिषदेने काही नागरिकांना घरपट्टीबाबत नोटिसा पाठवल्या आहेत. याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असून लोकांमध्ये संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील व्यापाऱ्यांनी नुकतेच मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल भोसले यांच्याकडून याबाबत माहिती जाणून घेतली.
या पार्श्वभूमीवर श्री. भोसले यांनी माहिती देतांना सांगितले आहे की, घरपट्टी करात कोणतीही वाढ झाली नसून ज्यांनी वाढीव बांधकाम केले आहे. तसेच मूळ जागेवर ज्यांनी नवीन बांधकाम केले आहे, त्यांची घरपट्टी अर्थातच वाढणार आहे. याचबरोबर झोन बदलला असेल तर झोननुसार कर आकारणी झाली आहे. नगर परिषदेने सर्व्हे केलानंतरच घरपट्टीबाबतच्या नोटिसा पाठवल्या गेल्या आहेत, अशी माहिती भोसले यांनी दिली.
चिपळूण शहरातील ३१ हजार ७४३ घरपट्टीधारकांकडून घरपट्टी वसूल केली जाते. चतुर्थ वार्षिक आकारणीमध्ये यातील १८ हजार ८६४ जणांना नोटीस पाठवली गेली आहे. नोटीस पाठवल्यानंतर २८ डिसेंबर २०२४ पर्यंत हरकती नोंदवण्यासाठी नागरिकांना वेळ दिला गेला आहे. नोटीस मध्ये जर काही चुकीच्या पद्धतीने कर आकारणी झाली असेल वाढीव बांधकाम नसताना कर आकारणी झाली असेल. नवीन बांधकाम नसताना कर आकारणी झाली असेल,किंवा माहिती देताना घेताना वर्षे चुकीचे दिले घेतले असेल अशाच लोकांना मालमत्ता करात वाढ झाली आहे अशा कुठल्याही पद्धतीच्या त्रुटी असतील तर त्यावर हरकत नोंदवण्यासाठी वेळ नगरपालिकेने दिला आहे.
याशिवाय ,जर चुकीच्या पद्धतीने नजरचुकीने वाढीव घरपट्टी लागू केली असेल तर नगरपालिकेचे संबंधित विभागाचे कर्मचारी पुन्हा त्या ठिकाणी जातील. नव्या मोजणी करतील आणि त्याप्रमाणे कर आकारणी होईल, यातून वस्तुस्थितीनुसार घरपट्टी आकारणी होईल, ज्या लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत आणि मोजमाप करण्यामध्ये वाढ झाली आहे. अशा मालमता धारकाचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हे करण्याचे काम चालू करीत आहोत,असे विशाल भोसले यांनी स्पष्ट करतांना घरपट्टी कर वसुलीत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील केले आहे.
Web Title: Confusion among citizens due to property tax notices in chiplun municipal council vishal bhosles clarification on house tax