कोरोना प्रतिबंधक लसींच्या दोन्ही डोसमधील अंतर ८४ दिवसावरुन २८ दिवसापर्यंत कसे करता येईल याबाबत विचार करण्यात यावा अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे केली आहे. राजेश टोपे दिल्लीत असून केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. राज्यातील विषयांवर आणि कोरोनाच्या उपाययोजना तसेच लसीकरणाच्याबाबत मांडवीया यांच्यासोबत राजेश टोपे चर्चा केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ वर्षांखालील मुलांचे कोरोनाप्रतिबंधक लसीकरण लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
राजेश टोपे यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री मांडविया यांना राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल माहिती दिली. त्याशिवाय कोरोनावर मात करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या उपाययोजना, लसीकरणाच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेने केलेले उल्लेखनीय काम यासारख्या विविध मुद्यांबाबत सविस्तर माहिती दिली. कोरोना लसीकरणाला वेग येण्यासाठी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करावे, अशी विनंती केली. काही देशांमध्ये लसीकरणाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यात आलेय. त्याप्रमाणे आपल्या देशातही विचार व्हावा. परदेशी नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणारे नागरिकांसाठी दोन मात्रांमधील अंतर कमी करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे याचाही विचार व्हावा, अशी विनंती राजेश टोपे यांनी मांडविया यांना केली.
राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला वर्ष पूर्ण झाले असून त्यांना ‘बुस्टर डोस’ देण्याची गरज आहे. जगभरात अनेक देशांनी ‘बुस्टर डोस’ देण्याची प्रक्रिया सुरू केली असून भारतानेही त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी टोपे यांनी केली. ‘बुस्टर डोस’प्रमाणे १८ वर्षांखालील लहान मुला-मुलींच्या लसीकरणाचाही मुद्दा महत्त्वाचा ठरू लागला असून लसीकरणाअभावी अनेक पालकांनी पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाची मोहीमही सुरू केली जावी, असा मुद्दाही टोपे यांनी मंडाविया यांच्या भेटीत मांडला. अनेक देशांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण केले जात आहे. आपल्या देशातही लोकांकडून तशी मागणी होऊ लागली असल्याचेही टोपे यांनी सांगितले.