रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी
विट्याहून भिवघाटकडे जाणारी एसटी आणि कर्नाटकातील विजापूरहून विटामार्गे मेढ्याकडे जाणारी एसटी बस रेणावी घाटातील मुख्य वळणावर समोरासमोर आली. दोन्ही बसची धडक एवढी जोरदार होती की, वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा मोठा आवाज परिसरात दूरवर ऐकू गेला. त्यामुळे आसपासच्या गावांतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातानंतर काही काळातच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. जखमींना बसमधून बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. नागरिक, पोलिस, प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी मदतकार्यात उतरल्याने जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करण्यात आली.
अपघातामुळे विटा-भिवघाट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दोन्ही बस रस्त्यावरच असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि बराच काळ वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे लागले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर उपचार सुरू केले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरू होती.
अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. नेमकी धडक कशामुळे झाली, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, अपघाताची तीव्रता पाहता जखमींची संख्या तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून पुढील माहिती घेण्याचे काम सुरू होते.
Vasai Fake Currency : वसईत मोठा पर्दाफाश, 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त, 30 लाखांत विक्रीचा होता डाव



