डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसर ते शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीला कंटाळून डोंबिवली शहर रिक्षा चालक-मालक संघटनेने महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. फेरीवाल्यांच्या अतिक्रमण हटवण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास, २४ ऑक्टोबर रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयासमोर शेकडो रिक्षाचालक तीव्र आंदोलन करतील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम; सपकाळांनी साजरी केली अनोखी दिवाळी
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसर नेहमीच गजबजलेला असतो. त्यातच अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्त्यांचा मोठा भाग व्यापल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे रिक्षा चालकांना वाहतुकीतून मार्ग काढणे अत्यंत अवघड झाले आहे, परिणामी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीचा फटका रिक्षाचालकांसह प्रवाशांनाही बसत आहे.
या गंभीर समस्येबाबत डोंबिवली शहर रिक्षा चालक-मालक संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे आणि उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी फेरीवाल्यांमुळे वाहतूक व्यवस्था कशी विस्कळीत झाली आहे आणि रिक्षाचालकांना कोणता त्रास सहन करावा लागतो, हे सविस्तरपणे मांडले आहे. गर्दीतून रिक्षा चालवताना, चुकून पादचाऱ्याला थोडीशी धडक लागली तरी नागरिक रिक्षाचालकांवर राग काढतात, अशी व्यथा त्यांनी मांडली. त्यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी कोणाची, असा थेट प्रश्नही संघटनेने प्रशासनाला विचारला आहे.
दरम्यान, या प्रकरणी महापालिकेचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसर ‘फेरीवाला मुक्त’ करण्यात आला असून, या परिसरात दररोज अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, प्रशासनाच्या या दाव्यावर रिक्षाचालक संघटना समाधानी नाही. रस्त्यावरची परिस्थिती पाहता, प्रशासनाची कारवाई पुरेशी नसल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. जर प्रशासनाने ठोस पाऊले उचलली नाहीत, तर रिक्षाचालकांचा संताप अधिक तीव्र होऊन आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही.
Eknath Shinde : लक्ष्मी घरी येणार! लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार; DCM एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही
रिक्षाचालकांच्या या इशाऱ्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे डोंबिवलीकर आणि रिक्षाचालकांचे लक्ष लागले आहे.
