देशभरात सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे.निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र या दिवसांमध्ये महागाई वाढू नये यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. वाढत्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. केंद्राकडून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी विशेष धोरण आखली जात आहे. पण त्याचा फारसा फायदा झालेला नाही. दिवसेंदिवस वस्तूंचे भाव वाढतच चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसला आहे.
मागील महिनाभरात डाळीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. डाळींसोबतच फळांच्या किंमती वाढल्या आहेत. द्राक्षे, केळी, पपई या फळांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. डाळींच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यानंतर सगळ्यात जास्त वाढ ही तूरडाळीच्या किंमतीमध्ये झाली आहे. तूर डाळ १७० रुपये किलो झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला डाळीच्या किंमती परवडत नसल्याचे चित्र सध्या बाजारात दिसून आले आहे. तसेच मागील दोन तीन दिवसांमध्ये डाळीच्या किमतीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. तर महिनाभरात डाळीच्या किंमतीमध्ये २० रुपयांनी वाढ झाली आहे. हरभरा आणि मसूर डाळीचे दर देखील वाढले आहेत.
फळांच्या किंमतींमध्ये वाढ
वाढत्या महागाईचा फटका येत्या निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे. डाळीचे दर वाढल्यानंतर द्राक्ष, सफरचंद, पपई आणि केळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. द्राक्षाचे दर प्रतिकिलो ८० रुपयांवरून १२० रुपयांवर गेले आहेत. तर किलो मागे ४० रुपये वाढ झाल्याने अनेकांनी द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवली आहे. तर काही दिवसांपूर्वी पपईचे दर ५० रुपये किलो होते. मात्र आता हेच दर ९० रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहचले आहेत. तर ५० रुपये डझनने मिळणारी केळी ७० ते ८० रुपये डझन एवढी किंमत झाली आहे. फळांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.