rohini khadse in police custody
जळगाव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जळगाव (Jalgaon News) जिल्ह्याच्या दौऱ्यावर पोहोचणार आहेत. जळगाव जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमात आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने (Rashtrawadi Congress) व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse In Police Custody) यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात दाखवणार होते काळे झेंडे
‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अनेक प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आजवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहेे. आज जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलंय. मात्र, या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला होता. या संदर्भात अनेक बैठकाही झाल्या होत्या.
एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांचं मनोमिलन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर दाखल केलेला अब्रु नुकसानीचा दावा मागे घेतलाय. त्यामुळे हे आंदोलन देखील राष्ट्रवादी काँग्रेस मागे घेईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आली होती.
खबरदारीचा उपाय म्हणून कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवणार होते. तसा इशारा पक्षाकडून देण्यात आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा देखील समावेश आहे.