पुणे : कसबा विधानसभा (Kasaba Assembly) मतदारसंघाच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक (By-Election) लढवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी विधान केले. त्यानंतर पक्षाने त्यांना घरचा आहेर दिला असून सबुरीचा सल्ला दिला आहे. मुक्ता टिळक यांच्यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०१९ साली ऐनवेळी आपले तिकीट कापले, असे रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या. मात्र, एखाद्या लोकप्रितिनीधीच्या दशक्रियाविधीआधीच त्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीबद्दल चर्चा करणे पुणे शहरातील राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, असे पुणे राष्ट्रवादीने (NCP) म्हटले आहे.
कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे वाटत नाही का तुम्हाला? असा प्रश्न रुपाली पाटील-ठोंबरेंना विचारला. त्यावर मुळात एक लक्षात घ्या २०१९ ला जी निवडणूक झाली त्यामध्ये मुक्ताताई आमदार झाल्या. त्या तेव्हापासून आजारी होत्या. बिचाऱ्या त्यांनी त्या आजारातसुद्धा जेवढे शक्य होते तेवढे काम केले. त्याआधी गिरीष बापट सर ३० वर्ष आमदार होते. पोटनिवडणूक झाल्यानंतर मतदार ठरवतील कोणाला निवडणूक द्यायचे. असे असते की पोटनिवडणूक बिनविरोध करावी. पण पंढरपूर पोटनिवडणूक, अंधेरी पोटनिवडणुकीत त्यावेळेस त्या महिलेला कोणी आणि किती त्रास दिला सगळ्यांनी पाहिले. जी पोटनिवडणूक लागणार आहे ती अशीच खेळीमेळीत पार पडावी अशी अपेक्षा आहे, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले होते.
रुपाली पाटील-ठोंबरेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एक व्हिडीओ जारी करुन भूमिका स्पष्ट केली. रुपाली पाटील-ठोंबरे यांचा थेट उल्लेख जगताप यांनी टाळला असला तरी पोटनिवडणुकीबद्दल अशापद्धतीने उतावळेपणे बोलणे शहराच्या राजकीय संस्कृतीला धरुन नाही. पुणे हे वैचारिक दृष्ट्या वेगळे शहर आहे. या शहरामध्ये चुकीच्या काही राजकीय परंपरा चालू व्हायला नको, असे जगताप म्हणाले. मुक्ताताईंचे जाणे हे सर्वच राजकीय पक्षांसाठी वेदनादायक आहे. त्यांच्या जाण्यानंतर त्यांचा अजून दशक्रीयाविधी सुद्धा व्हायचा आहे. असे असताना काही राजकीय मंडळी पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करायला लागले आहेत, असे जगताप यांनी म्हटलले आहे. तसेच, मुक्ताताई भाजपच्या असल्या तरी त्या आमच्या बहिणीसारख्या होत्या, असेही जगताप म्हणाले.