'भाजप नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावं, अन्यथा...; युवक काँग्रेसचा इशारा
सांगली : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. प्रचारासाठी केवळ सात दिवस राहिले असल्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. राष्ट्रीय पक्षांचे दिल्लीतील नेते महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्याचबरोबर नेत्यांच्या टीका टिप्पणी देखील वाढल्या आहेत. नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप तसेच वैयक्तिक टीका करत आहेत. भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या आजारावर वैयक्तिक टीका केली. यामुळे आता राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह महायुतीच्या नेत्यांनी देखील या टीकेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. यानंतर आता सदाभाऊ खोत यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
सांगलीतील प्रचारसभेमध्ये भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावरुन राजकारण तापले. शरद पवार यांच्या आजारावरुन सदाभाऊ खोत यांनी भरसभेमध्ये टीका केली. यामुळे सर्वांनी रोष व्यक्त केला. भरसभेमध्ये त्यांच्या या टीकेमुळे अजित पवार यांनी देखील संताप व्यक्त केला होता. अगदी अजित पवार यांनी फोन करुन सदाभाऊ खोत यांना खडेबोल सुनावले. त्याचबरोबर पुण्यातील सदाभाऊ खोत यांची पुण्यातील पूर्वनियोजित सभा व पत्रकार परिषद देखील ऐन वेळेला रद्द करण्यात आली. टीकेचा भडीमार झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
राजकीय वर्तुळातून जोरदार टीका झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी शरद पवार यांच्या आजारपणावर टीका केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. “माझा कुणाच्याही व्यंगत्वाकडे बघून बोलण्याचा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे, पण काही लोकांनी त्या शब्दाचा अर्थाचा विपर्यास केला. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी ते शब्द मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो.” अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली आहे.
काय होते खोत यांचे वादग्रस्त विधान?
सांगलीतील प्रचारसभेमध्ये भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी भाषणावेळी वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, “अरे पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे? राज्याची तिजोरी ही गाय आहे. ती गाय शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाहिजे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, चारही थाणे ही वासराचीच आहेत. मी सर्व दूध वासरालाच देणार. मग शरद पवार साहेबांना नऊवा महिना लागला आणि कळा सुटल्या, ” अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यामुळे राजकारण तापले होते.