Ashadhi Wari 2025 : चंद्रभागेतीरी 15 लाख वैष्णवांचा मेळा; पंढरीत विठ्ठल भक्तांचा जणू महापूरच
वाखरी : सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णवांसह टाळ, मृदंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करत भक्तीचे मळे फुलवत आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या श्री संत ज्ञानदेव, श्री संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव आदी संतांसह राज्यभरातून आलेल्या संतांचे पालखी सोहळे पंढरी समीप वाखरीत दाखल झाले आहेत. आता पंढरपूर हाकेच्या अंतरावर राहिले आहे.
संत ज्ञानदेव व संत तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्यातील उभे व गोल रिंगण अत्यंत उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडले. शनिवारी (दि.५) हा भक्तीचा महासागर विठूरायाच्या भूवैकुंठ नगरीत पोहोचेल व चंद्रभागेत विलीन होईल. भंडीशेगांव मुक्कामी पहाटे माऊलींची विधीवत पूजा पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते करण्यात आली. दिवसभर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कांदेनवमीच्या निमित्ताने पालखी तळावर वारकऱ्यांनी दिंड्या काढल्या.
या दिंड्यामध्ये कांदाभजी करून कांदेनवमी साजरी केली. दुपारचे भोजन घेऊन हा सोहळा शेवटच्या वाखरी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. दुपारी चार वाजता हा सोहळा बाजीराव विहीर येथे उभ्या रिंगणासाठी पोहोचला. दुपारी साडेचार वाजता अश्व धावण्यासाठी सोडण्यात आले. टाळ मृदुंगाच्या गजरात माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा अखंड जयघोष चालू होता.
रथाजवळ येऊन माऊलींचे घेतले दर्शन
अश्वांनी धावत जाऊन माऊलीला एक प्रदक्षणा पूर्ण करत रथामागे २० दिंड्यांपर्यंत गेला. त्यानंतर पुन्हा रथाजवळ येऊन माऊलींचे दर्शन घेतले. नारळ, प्रसाद घेऊन पुन्हा तो पंढरीच्या दिशेने धावत आला. यावेळी पुंडलिक वरदा, हरि विठ्ठल असा जयघोष वैष्णवांनी केला व उभे रिंगण पूर्ण करण्यात आले.
पालख्या आज पंढरीत
संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्वर, गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी), संत गोरोबा काका, जगनाडे महाराज आदी संतांच्या पालख्यांना विठुरायाच्या नगरीत नेण्यासाठी संत नामदेव महाराज यांची पालखी वाखरीत येईल. त्यानंतर हे सोहळे पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतील.
माऊलींची पालखी वाखरीतून पंढरपूरकडे
सर्व संतांना पुढे करून सर्वात शेवटी दुपारी माऊलींची पालखी वाखरीतून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्थ होणार आहे. विसावा पादुका येथे पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण होणार आहे.