फोटो सौजन्य - pinterest
पहाटेपासून सुरु असणाऱ्या पावसाचा जोर आता वाढला आहे. ठाण्यातील अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातील मुसळधार पावसामुळे प्रशासनातर्फे जिल्ह्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना देखील सतर्क राहण्याची विनंती करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. नागरिकांनी गरज असले तरच घराबाहेर पडा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. हवामान विभागाने आज ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हेदेखील वाचा- मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना आज पुन्हा सुट्टी; प्रशासनाचा निर्णय
नवी मुंबईत देखील पावसाचा जोर कायम आहे. नवी मुंबईतील सखल भागांत पाणी साचलं आहे, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. नवी मुंबईतील APMC भाजीपाला मार्केमध्ये देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाण्यातून वाट काढताना व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पालघरमध्ये देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पालघरच्या वाडा विक्रमगड भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- मुंबईत तुफान पाऊस; लोकलसेवा विस्कळीत; नागरिकांचे हाल; ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी
कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या भागात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कल्याणमधील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जांभूळ पाडा इथे धोक्याची पातळी ओलांडली आहे. उल्हास नदी धोक्याच्या पातळीच्या वर 1 मीटर वरून वाहत आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशानाने केलं आहे.