File Photo : Students
पुणे : पुण्यासह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. अनेक भागांत पाणी साचलेले आहे. तर रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याने, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली. शर्थीचे प्रयत्न करत, चाकरमानी आपल्या कामाच्या ठिकाणी आणि कार्यालयात पोहचत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये पावसाने तूफान बॅटिंग केली आहे. असे असताना हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या या इशाऱ्यानंतर आता या भागांतील शाळा गुरुवारी (दि.25) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.
लोणावळा परिसरातही जोरदार पाऊस
लोणावळा आणि परिसरात तूफान पाऊस होत आहे. या भागात तर ढगफुटीसदृश्य पावसाने सखल भागात पाणी साचले होते. याच पाण्यामुळे मळवली भागातील बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडकले होते. या पर्यटकांना बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आले आहे.