बाबा महाराज सातारकर : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन झाले आहे. ते वयाच्या ८९ वर्षांचे होते. नवी मुंबईमधील नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी २७ ऑक्टोबरला संध्याकाळी ४५ वाजता नेरुळ (Nerul) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.
बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर ८ महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली. बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे.
विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरी यावर बाबा महाराजांनी आयुष्य घालवलं. बाबा महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त जमत होते. अलिकडे वय झाल्यामुळे बाबा महाराज कीर्तनासाठी उभे राहात नव्हते. त्यांची ही परंपरा त्यांचा नातू पुढे नेत आहे. बाबा महाराज सातारकर यांनी १९८३ पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. यात त्यांनी भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर इत्यादी ठिकाणी कीर्तन सप्ताहांचं आयोजन केलं. त्यांनी जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेचीही स्थापना केली. या माध्यमातून भाविकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येते.