मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. केंद्र सरकारने असाच एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकारने शरद पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानिर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या सुरक्षेसाठी 55 सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असेल. आगामी विधानसभा निवडणूक आणि शरद पवारांना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना ही सुरक्षा पुरविल्याचे सांगितले जात आहे. पण दुसरीकडे स्वत: शरद पवार यांनीच या सुरक्षेवरच शंका उपस्थित केली आहे. गुरूवारी (22 ऑक्टोबर) नवी मुंबई येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हेदेखील वाचा: महाराष्ट्रातील पोलिसांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचा विश्वास नाही; असं का म्हणाले संजय राऊत?
शरद पवार म्हणाले, “मला फार काही माहिती नाही. पण गृहखात्याचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की, केंद्र सरकारने 3 लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. हे तीन लोकं म्हणजे मी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. पण मला झेड प्लस सुरक्षा कशासाठी दिली ते माहीत नाही. कदाचित निवडणुका तोंडांवर आल्याने माझ्या दौऱ्याची आगाऊ माहिती मिळवण्यासाठी ही सुरक्षा देण्यात आली असावी. असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, शरद पवार यांना यापूर्वीपासून राज्य सरकारकडून झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. पण तरीही केंद्र सरकारकडूनही ही सुरक्षा पुरवण्यात आल्याने राजकीय वर्तुळातूनच शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आपण या संदर्भात गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा: सायकलमुळे प्रायव्हेट पार्टला जखमा, बदलापुरातील मुख्यध्यापकाचा संतापजनक दावा