फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : राज्यामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. एका बाजूला राज्यात निवडणूकासाठी वातावरण निर्मिती सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला बदलापूर अत्याचार प्रकरणामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर राज्यात आरक्षणावरुन मोर्चे आणि आंदोलनं सुरु आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार व जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. या सुरक्षेवरुन खासदार संजय राऊत यांनी राज्यातील सरकारला टोला लगावला आहे.
शरद पवार यांना वाढीव सुरक्षा
केंद्रीय गृहमंत्रालयाने जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत निर्णय घेतला आहे. शरद पवार यांना आता झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्रातून घेण्यात आला आहे. शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि शरद पवारांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरविल्याचे सांगितले जात आहे. या मुद्द्यावरुन संजय राऊतांनी राज्य व केंद्र सरकारला घेरले आहे. मध्यमांशी संवाद साधताना त्यांनी टोला लगावला आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे. तरी देखील केंद्राला शरद पवार यांना वाढीव सुरक्षा द्यावी लागते, म्हणजे केंद्राला राज्य सरकारवर विश्वास नाही का? या आशयाचा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, ”केंद्र सरकारकडून शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. खरंतर ज्याची गरज नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातील पोलिसांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचा विश्वास नाही. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते विशेषतः अशावेळी जेव्हा महाराष्ट्रात त्यांचाच राज्य आहे, याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस जसं आमच्या मुलींचे रक्षण करू शकत नाही, त्याच पद्धतीने आमच्या प्रमुख नेत्यांचंही रक्षण करू शकत नाही. यावर आता केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केला आहे. तसेच तुमचे पोलीस आणि तुमची यंत्रणा कुचकामी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.
पोलीस खातं हे भ्रष्टाचारानं बरबटलेलं
पुढे त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था कमकुवत असल्याची टीका केली. तसेच वरिष्ठांची नियुक्ती ही संघप्रवृत्ती पाहून केली असल्याची टीका केली. खासदार राऊत म्हणाले, “राज्याच्या पोलीस महासंचालक या महिला आहेत, त्या जर जाहीरपणे सांगत असतील की मी संघाची कार्यकर्ता आहे तर अशा व्यक्तीकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता? या राज्यातल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या ज्याप्रमाणे नेमणूक झाल्या आहेत, त्यांची पार्श्वभूमी संघ परिवाराशी संबंधित आहे का? हे बघूनच त्यांना वरिष्ठ पदावर नेमणूक देण्यात आली आहे. त्यामुळे इतर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. राज्यातील पोलीस खातं हे भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे. कारण पैसे दिल्याशिवाय बढती आणि भरती होत नाही, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.