Yugendra Pawar's first speech in Baramati
कण्हेरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. राजकीय नेत्यांनी अर्ज दाखल करुन आता प्रचाराला सुरुवात केली आहे. बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार कुटुंबामध्ये लढत होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील बारामती मतदारसंघ हाय व्होलटेज ठरणार आहे. बारामतीमधून शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून आता प्रचाराचा शुभारंभ केला आहे.
युगेंद्र पवार हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे या तरुण नेतृत्वाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. प्रचाराची सुरुवात करताना युगेंद्र पवार यांनी आपले पहिले भाषण दिले आहे. यावेळी भाषणामध्ये युगेंद्र पवार म्हणाले की, कण्हेरी हे आपलं गाव आणि आपलं घर आहे. कण्हेरीमध्ये अनेक दशकांपासून परंपरा चालवत आलो आहोत. मलाच विश्वास बसत नाहीये की आज कण्हेरीमध्ये माझ्यासाठी प्रचार केला जात आहे. आम्ही पुढची पिढी सुद्धा ही परंपरा सुरु ठेवू. शारदाबाई पवार, शरद पवार व यशवंत चव्हाण यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ, असे म्हणत युगेंद्र पवार यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
पुढे ते म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार आणि अहिल्याबाई होळकर यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ. योग्य ती दिशा आपण देत राहू. साहेबांना 26 व्या वर्षी बारामतीकरांनी भरभरुन आशिर्वाद दिला. मुख्यमंत्री ते संरक्षण मंत्री अशी अनेक मोठी पदी त्यांनी काम केले. त्यांचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो. आज बारामतीचे नाव जर राज्यामध्ये नाही तर देशामध्ये गाजत असेल तर ते फक्त शरद पवार यांच्यामुळे आहे. हे काय लगेच होत नसतं. त्याला पन्नास वर्षे काम करावं लागलं आहे, असे देखील युगेंद्र पवार म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : “मी अपक्ष निवडणूक लढवणार…”, नवाब मलिकांकडून दोन अर्ज दाखल
युगेंद्र पवार म्हणाले की मी शरद पवार यांचा फॅन आहे. ते म्हणाले की, “लहानपणापासून मी ऐकत आलो आहे की, बारामती ही शरद पवारांची आहे. मला कळायला लागल्यापासून मी शरद पवार यांचा चाहता आहे. आपण एक आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. माझ्यासाठी शरद पवार हे तेव्हा पण..आज पण आणि उद्या पण आदर्श आहेत. त्यांचेच विचार घेऊन मी पुढे जाणार आहे. या आधी जे फुटीचे राजकारण झालं तेव्हा मी साहेबांसोबत कसा काय? असं काहीजण म्हणाले. पण आमच्या कुटुंबामध्ये आहेत. त्यांना माहिती होतं की हा पठ्ठ्या कधी पवार साहेबांना सोडणार नाही. काहीही झालं तरी पवार साहेबांना सोडणार नाही. माझी भूमिका काल होती. आज आहे आणि आयुष्यभर ही भूमिका असणार आहे,” असे मत युगेंद्र पवार यांनी व्यक्त केले आहे.