पाचगणी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने जावळी तालुक्यातील प्रती पंढरपूरमध्ये वैष्णवांचा मेळा भरला. लाखो भाविक विठ्ठल नामाच्या जयघोष करत करहर नगरीमध्ये येतात, यातच सातारा जिल्ह्याच्या राजकारणाच्या विरोधाच्या दोन बाजू शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) हे दोन कट्टर राजकीय विरोधक विठ्ठलाच्या पूजेसाठी जावळीत एकत्र आलेले पाहावयास मिळाले.
दोन वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीपासून आमदार शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंह राजे या दोन्हीही नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुका आणि त्यानंतर तालुक्यातल्या सोसायटीच्या निवडणुकीत दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगला कलगीतुरे रंगलेल्याचे दिसून आले. यातच दोन्हीही नेत्यांनी एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोपही केले. या आधी एका लग्नसोहळ्यात देखील ते समोरासमोर आले होते.
रविवारी आषाढी एकादशीच्या निमित्ताने शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे जावळीत विठ्ठल मंदिरामध्ये एकत्रित पूजा करण्यास आल्याचे दिसून आले. राजकीयदृष्ट्या गेल्या दोन वर्षात या दोन्हीही नेत्यांच्या गटात चांगलाच संघर्ष पाहावयास मिळाला आहे.