कोरोना(Corona)मुळे गेली दोन वर्षे किल्ले रायगडा(Kille Raigad)वर शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत होता. मात्र, यंदा शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघा रायगड परिसर दुमदुमला. सोहळा पाहण्यासाठी शिवप्रेमींची अलोट गर्दी झाली होती. यंदा ‘शिवराय मनामनात-शिवराज्याभिषेक घराघरांत’या संकल्पनेनुसार रायगडावर हा सोहळा साजरा करण्यात आला.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती (Yuvraj Sambhajiraje Chhatrapati) यांच्या सूचनेनुसार सोहळ्याची तयारी करण्यात आली होती. आज शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान संभाजीराजे छत्रपती काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, मी राज सदरेवर राजकीय भाष्य करणार नाही, असे त्यांनी सुरूवातीलाच स्पष्ट केले. यावेळी त्यांनी महाराजांचा निश्चय, काम करण्याच्या पद्धतीमुळे पध्दतीमुळे लोकसंचय वाढला. शिवाजी महाराजांच्या अखंड ध्यासामुळे सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे ‘स्वराज्य’ (Swarajya) उदयास आले आणि महाराज छत्रपती झाले, असे सांगत उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळी अंधार पडताच किल्ले रायगड या रोषणाईने उजळणार आहे. गडावर पाच ते सहा लाख शिवभक्तांचे अन्नछत्र उभारण्यासह राजसदर फुलांनी सजविण्यात आले आहे. भवानीपेठ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधी विद्युत रोषणाईने उजळून निघणार आहे.