मुंबई : शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानाबाहेर आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers Protest Near Sharad Pawar House) शरद पवारांच्या घराबाहेर दगडफेक आणि चप्पल फेक केली. (MSRTC Workers Protest) या घटनेचे तिव्र पडसाद देशभरात उमटत असताना काल रात्री आझाद मैदानात बसलेल्या आंदोलकांना पोलिसांनी हुसकावून लावलं. आता हे आंदोलनकर्ते सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या मारून बसले आहेत. आम्हाला पोलिसांनी मध्यरात्री लाठीचार्ज करून बाहेर काढले. आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे. बाहेरचे पोलीस आम्हाला रेल्वे स्थानकाबाहेर येऊ देत नाहीत आणि रेल्वे स्थानकातून ही पोलीस जा सांगत आहेत. यामुळे आता आम्ही काय करणार आम्ही इथेच बसून राहू असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्यामधील एका गटाने आक्रमक भूमिका घेऊन थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरासंमोर आंदोलन केले. काल दुपारच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकच्या आवारात घुसखोरी करत आंदोलन केले. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आक्रमक झाल्याचे दिसून आले. आंदोलकांनी थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाच्या आवारात घुसून दगडफेक, चप्पलफेक केली.
खासदार शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक केली. त्यांना रात्री अकरा वाजता वैद्यकीय तपासणीसाठी आधी नायर आणि मग जेजे रुग्णालयात नेण्यात आले. सुमारे चार तास त्यांची मेडिकल जेजे मध्ये करण्यात आली. पोलिसांनी त्यांना रात्रभर माध्यमांसमोर येण्यापासूनचा रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. आज सदावर्ते यांना अकरा वाजताच्या दरम्यान न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांनी दिली आहे.
[read_also content=”शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांकडून दगड आणि चप्पल फेक, सुप्रिया सुळेंचा आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न https://www.navarashtra.com/maharashtra/msrtc-workers-protest-near-sharad-pawar-residence-silver-oak-nrsr-266113.html”]