राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय, आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना आणि वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याप्रकरणी जीआरही काढण्यात आला.
राज्यभरातील सर्व टोल वारकऱ्यांसाठी मोफत असणार आहे. आजपासून म्हणजेच 3 जुलै ते 21 जुलैपर्यंत प्रवाशांना टोलमाफी दिली जाणार आहे. राज्य सरकारने संबंधित जीआर जारी केला आहे. यासंदर्भात अक्षय महाराज भोसले यांनीच माहिती दिली आहे.
राज्यभरातील वारकऱ्यांना सध्या आषाढी एकादशीचे वेध लागले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह वारकरी दिंडीत लाखो भाविक पंढरपुरला विठुरायांच्या प्रसादासाठी सहभागी झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ केला.
17 जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला जातात. वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांना परिवहन विभागातून आवश्यक स्टिकर्स वाहनांना दिले जाणार आहेत. ३ जुलै ते २१ जुलै दरम्यान या कालावधीत ही सवलत राहणार आहे. गरज पडल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतूकीसाठी वारीतील वाहने सोडून अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातून पंढरपूरकडे येणारे सर्व नाक्याांवर ही टोलमाफी असेल.