
रेशनिंगच्या धान्याला सोंडकिडीचा प्रादुर्भाव? गेल्या महिन्यापासून निकृष्ट गहू-तांदळाचा पुरवठा
मल्हारपेठ : पाटण तालुक्यात पुरवठा विभागामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या रेशनिंगच्या धान्याच्या दर्जाबाबत तक्रारी वाढत आहेत. गेल्या महिन्यापासून काही ठिकाणी गहू व तांदळाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून करण्यात येत असून, धान्यामध्ये सोंडकिडीचा प्रादुर्भाव असल्याचेही सांगितले जात आहे.
रेशनिंगच्या धान्यावर तालुक्यातील अनेक गरीब व गरजू कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून मिळणारे धान्य स्वच्छ, सुरक्षित व चांगल्या दर्जाचे असणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या काही काळापासून मिळणाऱ्या गहू-तांदळाबाबत लाभार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. येत्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेशनिंगचे धान्य मोठ्या प्रमाणावर वितरित होत असताना त्याचा दर्जा तपासूनच लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. निकृष्ट अथवा किड लागलेले धान्य लाभार्थ्यांच्या आरोग्यासाठीही अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे संबंधित धान्यसाठ्याची तातडीने तपासणी करून दोषी आढळणाऱ्या साठ्याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, पुरवठा विभागाने रेशन दुकानांमधील धान्याचा दर्जा, साठवणूक व्यवस्था आणि वितरण प्रक्रियेची पाहणी करून लाभार्थ्यांना दर्जेदार धान्य मिळेल याची खात्री करावी. विशेषतः सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबांना चांगल्या प्रतीचे गहू व तांदूळ उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी पुरवठा प्रशासनाकडे केली आहे.