sushma andhare on badlapur school case
मुंबई : राज्यामध्ये सर्वत्र बदलापूर अत्याचार प्रकरणाची चर्चा आहे. शालेय विद्यार्थींनीवर केलेल्या अत्याचारामुळे संपूर्ण राज्य हादरुन गेले आहे. अवघ्या 4 वर्षांच्या मुलींवर शिपाई अक्षय शिंदे या नराधमाने अत्याचार केले आहे. त्याला अटक करण्यात आली असली तरी तक्रार केल्यानंतर कारवाईमध्ये दिरंगाई झालेली दिसून आली. तक्रार दाखल केल्यानंतर 12 तास देखील कोणतीच कारवाई न झाल्याने बदलापूरमध्ये लाखो लोकांचा समुदाय आंदोलन करत रेल्वे रुऴावर उतरला होता. दिवसभराच्या आंदोलनानंतर देखील माघार घेत नसल्यामुळे आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीकास्त्र डागले आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
वामन म्हात्रेला वेगळी ट्रिटमेंट का?
पोलिसांनी बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये दिरंगाई केलेली स्पष्ट दिसून आली. तसेच पीडित मुलींच्या पालकांनाच पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. पोलिसांनी कारवाई न केल्याने आणि कायदा व सुव्यवस्था न राखल्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी. गेल्या 10 वर्षांत एकूण साडेसात वर्ष देवेंद्र फडणवीस मंत्री आहेत. ज्यांनी न्याय मागितला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. पण ज्या वामन म्हात्रेने अत्यंत घाणेरडी टिप्पणी केली त्याला तुम्ही सोडून देता. वामन म्हात्रेला का अटक केली नाही? प्रश्न विचारणाऱ्या पालकांना अटक करता आणि वामन म्हात्रेला वेगळी ट्रिटमेंट का? एकनाथ शिंदेंचा तो जवळचा आहे म्हणून? असा सवाल सुषमा अंधारे यांनी महिला पत्रकाराला वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
त्यांना हिमालयात पाठवा
तसेच बदलापूरमध्ये आंदोलकांची समजूत काढण्यासाठी मंत्री गिरीज महाजन गेल होते. यावरुन देखील अंधारे यांनी टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना विषय हाताळता येत नाही. त्यामुळे त्यांना हिमालयात पाठवा. गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री करा. गिरीश महाजन एवढे शहाणे, गुणी असतील तर त्यांना मुख्यमंत्री करा, अशी टीका अंधारेंनी केली.
तर का लोकांनी आंदोलन केलं असतं?
तसेच अक्षय शिंदेऐवजी अकबर शेख वगैरे असता तर नितेश राणेने थयथयाट केला असता. हलकटपणा आहे हा. तुम्ही जात धर्म बघून व्यक्त होता का. तुमच्या लेखी लेकीबाळींच्या सुरक्षा काही आहे की नाही. न्याय मिळाला असता तर का लोकांनी आंदोलन केलं असतं का? यांना न्यायच द्यायचा नाहीय. यांना काहीच द्यायचं नाहीय. कमिशनर डुंबरे यांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवं. का लोक संतप्त झाले आहेत” असा सवाल सुषमा अंधारे यांनी सरकार व ठाणे पोलीस आयुक्तांना विचारला आहे.