सुषमा अंधारे यांची सचिन वझेंवर टीका
मुंबई : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वझे यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. वझे यांनी अनिल देशमुख यांच्यांवर गंभीर आरोप केल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. फडणवीसांकडे पुरावे दिल्याचा आरोप केल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी थेट महायुतीच्या नेत्याचे नाव घेत ते वझे यांचे बोलवते धनी असल्याचा घणाघात केला आहे.
मै वो हू जो हवाँओ रुख बदल देता हूँ…!
माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या नेत्यांवर आणि सचिन वझेंवर निशाणा साधला. अंधारे म्हणाले, मला सचिन वाझे यांच्या आरोपाचं टायमिंग फार गंमतीशीर वाटत आहे. ज्या पद्धतीने गेल्या 15 दिवसात अनिल देशमुख हे सातत्याने पत्रकार परिषद घेत आहेत. त्यात ते अजित पवार किंवा आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यासाठी त्यांच्यावर काय पद्धतीचा दबाव आणला जात होता, हे सांगत आहेत. त्याबद्दल प्रतिज्ञापत्र द्या, असेही वारंवार त्यांच्याकडून सांगितले जात होते. त्यात काल अचानक एका कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मै वो हू जो हवाँओ रुख बदल देता हूँ…! असे वक्तव्य केले. मग त्यांना जे हवाँओ रुख बदलायचे होते, ते काय सचिन वाझेच्या माध्यमातून बदलायचे होते”, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनाच पत्र का लिहिले?
सुषमा अंधारे यांनी थेट विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक या तिघांना रुग्णालयात हजर करतेवेळी माध्यमांशी बोलायला संधी मिळाली नाही. मग ती संधी नेमकी सचिन वाझे यांना कशी मिळते आणि वाझे यांना जर काही लिहायचं होतं, तर मग त्यांना इतका वेळ का लागला? वाझे यांनी देवेंद्र फडणवीसांनाच पत्र का लिहिले? हा देखील एक प्रश्न आहे”, असे मत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.