
तलाठी, कोतवाल नावे इतिहास जमा
अमरावती : गावस्तरावरील तलाठी हे पदनाम बदलून आता ‘ग्राम महसूल अधिकारी’ असा बदल करण्यात आला आहे. तसेच कोतवाल यांचे पदनाम बदलून ‘महसूल सेवक’ करण्यात आले आहे. तसेच कार्यालयातील अव्वल कारकून यांच्या पदनामात बदल करण्यात आला असून, त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून ओळखले जाणार आहे.
महसूल विभागातील तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येत होती. ही मागणी मान्य करत शासनाने 14 ऑक्टोबर रोजी तसा शासन निर्णय जाहीर केला आहे. महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील अव्वल कारकून गट ‘क’ पदाचे पदनाम बदलून ‘सहायक महसूल अधिकारी’ करण्यात आले आहे.
अव्वल कारकून या संवर्गास महसूल विभागामार्फत मदत व पुनर्वसन विभागामार्फत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत गृह विभागामार्फत सामाजिक न्याय विभागामार्फत राज्य पुरस्कृत योजना व केंद्र पुरस्कृत योजना, सामान्य प्रशासन विभागामार्फत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत, रोजगार हमी योजना विभागामार्फत, राजशिष्टाचार करणे, नैसर्गिक आपत्ती काळात मदत विभागामार्फत, विविध केंद्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा विभागामार्फत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तसेच इतर विविध विभागांमार्फत नेमून दिलेली कामे व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकाऱ्यांना कराव्या लागणाऱ्या सर्व कामांमध्ये मुलभूत माहितीचे संकलन करुन त्यावर टिप्पणी सादर करणे, विविध मसुदे तयार करणे, जमीन महसूलाचे दस्तऐवज वा लेखे यांच्या नोंदी, शासनातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रांची तपासणी व पुनर्वसन आदी कामांचा समावेश आहे.
कोतवालांनी केली होती मागणी
कोतवालांनीही शासनाकडे कोतवालपदाचे पदनाम बदलून महसूल सेवक करावे, अशी मागणी केली होती. यावर अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सचिव समितीने कोतवाल पद हे ब्रिटिशकाळापासून अस्तित्वात आहे. त्यामुळे कोतवाल पदाचे महसूल सेवक करण्यात यावे, अशी शिफारस केली होती.